विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य पिकाविषयी गोडी निर्माण होण्यासाठी आहार कार्यशाळा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : कृषी विभाग महाराष्ट्र शासन तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव व श्रीमान गोकुळचंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने तृणधान्य पिकाचे आरोग्यातील महत्व या विषयी जनजागृती करणे करिता कोपरगाव शहरातून प्रचार फेरी आयोजित करण्यात आली.

विद्यार्थ्यांना तृणधान्य पिकाचे आहारातील महत्त्व व त्यांची ओळख याविषयी माहिती होण्याच्या हेतूने पोषण आहार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून नीलिमा जोरवर, कळसुबाई फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड नाशिक, तहसीलदार संदीप कुमार भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, श्रीमान गोकुळचंद विद्यालय येथील शिक्षक अमृतकर सर, कोताडे सर सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना मनोज सोनवणे यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३  साजरे करणे मागील पार्श्वभूमी, मिलेटचे आहारातील महत्व व कार्यशाळा आयोजन मागील हेतू बाबत माहित दिली.

उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता नाशिक येथील नीलिमा जोरवर, कळसुबाई फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड या उपस्थित होत्या त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मिलेट व त्याचे आहारातील महत्त्व तसेच आपल्या भागात घेतल्या जाणाऱ्या विविध तृणधान्य बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. 

या कार्यशाळेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य पिकाविषयी गोडी निर्माण होण्याचे हेतूने प्रचार फेरी, चित्रकला, रांगोळी तसेच वकृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यास प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन  सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक ठाकरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन गावीत यांनी केले.