शिर्डी विमानतळाच्या नाईट लँडिगचा प्रश्न सुटल्याने व्यवसाय वृद्धीला चालना – आमदार काळे

       कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : काकडी विमानतळाचे लोकार्पण होऊन देखील विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित होते त्याचबरोबर नाईट लँडिंगचा प्रश्न देखील प्रलंबित होता. त्याबाबत राज्यात आघाडी सरकार असतांना उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून काकडी विमानतळाचा  नाईट लँडिंगचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे काकडी व परिसराच्या व्यवसाय वृद्धीला चालना मिळणार असून नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

देशातील धार्मिक देवस्थानामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या शिर्डी येथील श्री साईबाबांचे देश विदेशात असंख्य साईभक्त आहेत.  तालुक्यातील  काकडी व परिसराचा विकास व्हावा तसेच जगभरातील साईभक्तांना शिर्डीला येणे सोयीस्कर व्हावे व साईभक्तांचा वेळ वाचावा या उद्देशातून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे विमानतळ उभारण्यात आले होते. या विमानतळाचे सन २०१७ साली लोकार्पण झाले.

मात्र लोकार्पण झाल्यापासून या विमानतळावरून विमानांचे उड्डाणासाठी सातत्याने अनेक अडचणी येत होत्या.तसेच विमानतळावर डीव्हिओआर अर्थात कमी दृष्यमानतेवर मात करणारी ‘डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज’ हि सेवा बंद असल्यामुळे नाईट लँडिंग सुविधा देखील बंद होती. अशा अनेक अडचणींच्या गर्तेत काकडी विमानतळ सापडले होते.

त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने हे प्रश्न मांडले होते. त्याबाबत अनेकवेळा मंत्रालयात बैठका देखील घेतल्या होत्या. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या देश विदेशातील साईभक्तांना काकडी विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्या,कार्गो सेवा सुरू व्हावी, नाईट लँडिंग सुविधा सुरू व्हावी तसेच काकडी व परिसराचे प्रश्न सुटावेत यासाठी आ.आशुतोष काळे यांनी  काकडी विमानतळासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडून १५० कोटी निधी मिळविला आहे.

नाईट लॅडींग सेवा सुरू होण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय उड्डाण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून काकडी विमानतळावर नाईट लँडिंग ची यशस्वी चाचणी झाली असून प्रवाशांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्याने काकडी विमानतळावर येणाऱ्या विमानांच्या फेऱ्या वाढणार आहे. व्यावसायिकांना चोवीस तास व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार असून आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

विमान तळाचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी २०२३- २४ च्या अर्थसंकल्पात प्रवासी टर्मिनल साठी ५२७ कोटी निधी आ.आशुतोष काळे यांनी मिळविला आहे. एकूणच काकडी विमानतळाच्या विकासाला आ.आशुतोष काळे यांनी चालना दिल्यामुळे विकासाचे प्रश्न मार्गी लागले आहे. त्यामुळे काकडी व परिसरातील व्यावसायिकांनी तसेच विमानाने येणाऱ्या साई भक्तांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

माजी आमदार अशोकराव काळे यांनी दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या काकडी व परिसराच्या विकासासाठी काकडी येथे विमानतळ उभारले. मात्र जेव्हापासून काकडी विमानतळ सुरू झाले तेव्हापासून काकडी विमानतळाच्या अनेक समस्या होत्या तसेच काकडी ग्रामस्थांचे देखील अनेक प्रश्न प्रलंबित होते. त्याबाबत आम्ही आ.आशुतोष काळे यांच्याकडे हे प्रश्न मांडले होते.हे प्रश्न सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी नामदार अजितदादा पवार व महाराष्ट्र विमान विकास कंपनीचे कार्यकारी संचालक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून अनेक प्रश्न मार्गी लागले असून नाईट लँडिंगचा प्रश्न देखील सुटला आहे.त्यामुळे निश्चितपणे व्यवसायवृध्दी होणार आहे. त्याबद्दल काकडी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचे आभार. – प्रभाकर गुंजाळ.