फिरत्या वैद्यकीय सेवेमुळे गोरगरीब घटकांचे आरोग्य सुदृढ – चांदगुडे महाराज

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी गोरगरीब घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचले, त्यांच्या दुसऱ्या पिढीने फिरत्या वैद्यकीय सेवेतून कोपरगाव विधानसभा मतदार संघासह आसपासच्या तालुक्यातील खेड्यापाड्यातील गोरगरीब घटकांची मोफत वैद्यकीय तपासणी करून त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात सातत्य ठेवले असल्याचे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे हभप बाबुराव महाराज चांदगुडे यांनी केले.

               तालुक्यातील संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित फिरत्या वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेच्या शिबिराचे हभप बाबुराव महाराज चांदगुडे यांच्या हस्ते चासनळी येथे उद्घाटन झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे होते.

               ह भ प बाबुराव महाराज चांदगुडे पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी या भागात स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मृती जपण्यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू करून वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाला चालना दिली आहे. त्यांच्या तिसऱ्या पिढीने गोरगरीब जनतेचे दुःख जाणून घेत त्यांच्या दारापर्यंत वैद्यकीय सेवा पुरवण्याचा जो उपक्रम सुरू केला तो कौतुकास्पद आहे.

भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी ग्रामीण भागातील महिला भगिनींना स्वयंरोजगाराची चालना देण्यासाठी महिला बचत गटाची क्रांती घडवून आणली आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे सातत्याने आधुनिकतेचा पुरस्कार करून ग्रामीण भागातील वंचित घटकांचे दुःख दूर करण्यासाठी कष्ट घेत आहेत. कोल्हे कुटुंबीय त्यांचे वाढदिवस मोफत वैद्यकीय तपासणी, मोफत नेत्र मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया, हुशार गोरगरीब, मुला मुलींना मोफत वह्या, शालेय साहित्यांचे वाटप करून वंचित घटकांचा आनंद द्विगुणीत करीत आहेत.

त्यांचा हा उपक्रम सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. या शिबीरात २०० रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. चासनळीचे सुपुत्र मनेष दिनकर गाडे यांची सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.