देर्डे कोऱ्हाळे परिसरात बिबट्याची दहशत, पिंजरा लावण्याची मागणी – अरुणराव येवले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : तालुक्यातील दर्डे कोऱ्हाळे परिसरातील चारी क्रमांक ८ माजी सरपंच साहेबराव शिंदे यांच्या वस्ती परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला असून येथील जनजीवन घबराटीचे झालेले आहे, कुत्रे, शेळ्या, कोंबड्या यावर रात्री अपरात्री बिबट्या ताव मारीत असल्याने घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे.

तेव्हा राज्याचे वनमंत्री यांनी येथील बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी तातडीने आवश्यकता उपाययोजना करून पिंजरा लावून या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुण येवले यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली आहे.

   माजी सरपंच साहेबराव शिंदे म्हणाले की, माझे मर्यादित कुटुंब आहे, बिबट्याचा मुक्त संचार या परिसरात वाढल्याने मनामध्ये भीती तयार झाली आहे. कोपरगाव वन विभागाच्या अधिकारी, पोलिस स्टेशन तसेच प्रांताधिकारी शिर्डी यांच्याकडे पिंजरा लावून बंदोबस्त म्हणून मागणी केली त्यावर संबंधित वन विभागाने असमर्थता दर्शवली आहे.

परिसरातील बिबट्यांना येथे नेहमीची ये-जा करण्याची सवय झाल्याने आम्हाला घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे, या बिबट्याने आमच्या एकुलता एक मुला मुलीवर हल्ला केला तर काय होईल या भीतीनेच आमची गाळण उडाली आहे, असे असं नाही प्रशासन वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

    येवले पुढे म्हणाले की, बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतातील कामे खोळंबलेली आहेत आहे, कष्टकरी, शेतमजूर, दूध उत्पादक, शेतकरी, महिलांसह अबाल वृद्धांना तसेच शाळेत ये जा करणारे विद्यार्थ्यांमध्ये भीती वाढली आहे, भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांना याबाबत कल्पना देण्यात आली असून त्यांनीही प्रशासकीय यंत्रणेच्या कानावर या संकटाची माहिती देऊन बिबट्यांचा बंदोबस्त करावा म्हणून मागणी केली आहे., मात्र या बिबट्यांचा बंदोबस्त अजूनही झालेला नाही.

येथील वन विभागाचे अधिकाऱ्यांनी बिबट्याला मारता येत नाही, तसेच पकडण्यासाठी पिंजरे देखील लावण्याची परवानगी नाही असे सांगून हात वर केलेले आहे, त्यामुळे या परिसरात निर्माण झालेले बिबट्याचे संकट कसे दूर होणार हा कायमचा प्रश्न आहे. तेव्हा थेट वन मंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घालावे तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या भागातील दैनंदिन जीवनमान अधिक सुरळीत कसे होईल हा प्रयत्न करावा व या बिबट्यापासून कायमची मुक्तता करावी अशी मागणी अरुण येवले यांनी केली आहे.