उद्या शेवगांवात तालुका टंचाई आढावा बैठक

शेवगांव प्रतिनिधी, दि ११: सप्टेंबर महिना संपत आला तरीही तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी खरीपाची पिके जळून गेली आहेत. अनेक गावात वाड्या वस्त्यांवर पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण झाली तेथे टँकरने पिण्याचे पाणी देण्याची गंभीर परिस्थीती निर्माण झालेली आहे. या पार्श्चभूमीवर आमदार मोनिकाताई राजळे यांचे सुचनेनुसार शेवगांव तालुक्यातील टंचाई परिस्थीतीचा आढावा घेण्याबरोबरच जलजीवन मिशन योजनाची कामे, वीज प्रश्न, रोहयो कामांची मागणी, जलसंधारण, रस्ते, पाटपाणी, कृषी विभाग, ताजनापुर उपसा सिंचन योजना, प्रादेशिक पाणी पुरवठा, कायदा व सुव्यवस्था, या सर्व कामांचा  व प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महसूल प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस प्रशासन, व संबंधीत सर्व विभाग प्रमुख यांचे समवेत टंचाईआढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

              त्यानुसार शेवगांव तालुक्याची टंचाई आढावा बैठक मंगळवारी (दि १२ ) सकाळी ११ वा. अजिक्य लॉन्स, नेवासा रोड, शेवगांव येथे होणार आहे. या बैठकीसाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन आ.  राजळे यांनी केले आहे.