कोपरगाव, धारणगाव, कुंभारी, कोळपेवाडी, शहाजापूर रस्त्यासाठी १५ कोटींचा निधी प्रस्तावित – आ.विवेक कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कोपरगाव–धारणगाव–कुंभारी–कोळपेवाडी–शहाजापूर या पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी १५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधी (सीआरआयएफ) २०२६-२७ च्या प्रस्तावित यादीत या रस्त्याचा समावेश झाला असून, लवकरच आवश्यक मंजुरी मिळवून प्रत्यक्ष काम सुरू केले जाणार असल्याची माहिती आ. विवेक कोल्हे यांनी दिली.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आ. विवेक कोल्हे यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सहकार्य केल्याबद्दल केंद्र शासनासह राज्य शासनाचेही कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले. या रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर मंजुरी मिळवून प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोपरगाव–धारणगाव–कुंभारी–कोळपेवाडी–शहाजापूर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी निर्माण झालेल्या समस्यांमुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याची सुधारणा होणे गरजेचे होते.

या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या सुधारणेसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. आता सीआरआयएफ २०२६-२७ च्या प्रस्तावित यादीत या रस्त्याचा समावेश झाल्याने निधी मंजुरीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या कामासाठी १५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असून, आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन आहे.

या रस्त्याची सुधारणा झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची वाहतुकीची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहनधारकांचा प्रवास अधिक सुलभ होऊन परिसरातील गावांमधील दळणवळण व्यवस्था सुधारण्यास हातभार लागणार आहे. ग्रामीण भागातील रस्ते आणि पायाभूत सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply