कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : शेकडोंच्या गर्दीत घुसुन चोरी करायची आणि पोलीसांच्या समोरच संपूर्ण गर्दीतून पळ काढण्याच धाडस कोपरगाव मध्ये चोराने केलं आहे. कोपरगाव शहरात नव्याने सुरु झालेल्या कृष्णा कलेक्शनच्या भव्य नव्या दालनाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष पराग संधान, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, राजेश परजणे या प्रमुख अतिथी सह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी कोपरगावच्या दोन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी व अनेक पोलीस कर्मचारी चौका चौकात व कार्यक्रमस्थळी डोळ्यात तेल घालुन सुरक्षा करीत असताना तिथे एका चोराने चांगलाच धुमाकूळ घातला.

या कार्यक्रमात पालकमंत्र्यांसह उपस्थित मान्यवर फित कापण्यात मग्न होते. तर एक चोर खिसे कापन्यात मग्न होता. एका व्यक्तीचे १० हजार रुपये असलेले पाकीट मारताल्याचे संबधीत व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने चोराला पकडून चोराच्या दोन थोबाडीत मारले इतक्यात चोराने संबधीत व्यक्तीला झटका देवुन चक्क सभा मंडपात पळ काढला. पळणाऱ्या चोराकडे उपस्थित शेकडो नागरीक बघत होते. पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने व चार पोलीस कर्मचारी सभा मंडपाच्या गर्दीतून पाठलाग करत होते.

एका व्यक्तीच्या पाठिमागे पोलीस का पळतात हे कोणाच्याही लक्षात येत नव्हते पण पाठीमागुन एक व्यक्ती मोठ्याने ओरडत सुटला पैसे चोरले पैसे चोरले तेव्हा कळाले चोराच्या मागे पोलीस पळतात. संबधीत चोर पोलीसांपेक्षा चपळ असल्याने पळणाऱ्या चोराला पोलीस कर्मचारी तुषार कानवडे यांनी हातातली काठी फेकून मारली पण ती काठी चोराला लागण्या ऐवजी पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांच्या डोक्याला लागली. सोन्ने यांच्या डोक्यावरची टोपी खाली पडली सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

पळणारा चोर सुसाट पळत भिंतीवरून उडी मारून गेला, इथे पोलीस कमी पडले. पोलीस कर्मचारी तुषार कानवडे यांनी जीवाची परवा न करता थेट भिंतीवरून उडी मारुन चोराचा पाठलाग केला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने व इतर पोलीसांनी उड्या मारून पकड्याचा प्रयत्न केला. चोराने अति चपळाईने पोलीसांच्या हातात तुरी देवुन पसार झाला. पोलीसांनी शर्तीचे प्रयत्न केले,पोलीसांच्या उड्या अपयशी ठरल्या.

चोर पोलीसांचा हा लपंडाव सिनेस्टाईल प्रमाणे एखाद्या चिञपटाला साजेसा होता.हे सर्व शेकडो नागरीक पहात होते. कृष्णा कलेक्शनच्या शुभारंभा पेक्षा चोर पोलीसांच्या सिनेस्टाईलची चर्चा जोरदार सुरु होती. दरम्यान उद्घाटनाचा कार्यक्रम संपला पालकमंत्री कोपरगाव सोडण्याच्या तयारीत असताना पुन्हा शहरात एका महीलेच्या हातातली पैशाची पिशवी हिसकावून ५० हजार चोराने लुटले.

दोन पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ हाकेच्या अंतरावर चोरांनी चोरी केल्याची दुसरी घटना घडली. दोन्ही पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ स्वामी समर्थ मंदीरासमोर शितल विक्रम पवार रा मोहनीराज नगर या महीलेचे ५० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. शितल पवार ह्या महाराष्ट्र बॅंकेतून दिवाळी दसऱ्याच्या निमित्ताने मुलाबाळांना कपड्यासह इतर खरेदी करण्यासाठी ५० हजार रुपये रोख काढून पिशवीत ठेवले होते. हातात पैशाची पिशवी घेवू दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घरी जात असताना दोन चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून स्वामी समर्थ मंदीरासमोर मुख्य रस्तावर दोन तरून मोटार सायकलवरून आले व पिशवी हिसकावून पोबारा केला.

जवळच्या काही तरुणांनी चोरांचा पाठलाग केला पण हे चोर कोणाच्याही हाती लागले नाही. पोलीसांच्या साक्षीने व पोलीस स्टेशनच्या जवळून चोरी करण्याचे धाडस चोरामध्ये आल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण घटनेबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

खुद्द पालकमंत्री, दोन आमदारांसह पोलीस अधिकारी, अनेक पोलीस कर्मचारी ,नागरीकांच्या साक्षीने चोराने चोरी करुन पळुन गेला पण एकाच्याही हाती तो लागला नाही. पोलीसांच्या नाकावर टिच्चून चोरी केल्याने पोलीसांच्या कमकुवतपणा बद्दल दिवसभरात कमाली चर्चा सुरु होती.

