कोपरगाव प्रतिनिधी, दि. 24 : कोपरगाव परिसरातील जलसाठे सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या हिंगणी बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आमदार विवेक कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोपरगाव परिसरातील विविध बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी २९ लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्यातील १ कोटी १० लाखांच्या निधीतून हिंगणी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचे काम होणार असून भविष्यात अपव्यय होणारे पाणी जपण्याच्या दृष्टीने या कामाकडे पाहिले जाते आहे.

या कामाच्या पहिल्या टप्प्यात ३५ नवीन लोखंडी फळ्या प्रत्यक्ष दाखल झाल्या असून, त्यांचा वापर बंधाऱ्यातील पाणी अडवून जलसाठा निर्माण करण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी अधिक प्रभावीपणे अडवणे आणि त्याचा परिसरातील शेती व पाणीवापरासाठी उपयोग करणे शक्य होणार आहे.

माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून गोदावरी नदीवरील पहिला बंधारा म्हणून असणारा हिंगणी बंधारा हा परिसरातील जलव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, त्याची दुरुस्ती व आवश्यक संरचनात्मक कामे पूर्ण झाल्यानंतर बंधाऱ्याची पाणी अडविण्याची क्षमता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. विशेषतः पावसाचे पाणी वाहून न जाता त्याचा स्थानिक पातळीवर जलसाठा निर्माण करण्यासाठी उपयोग होईल.

आमदार विवेक कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघातील विविध बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न सातत्याने शासनाच्या स्तरावर मांडून निधीसाठी पाठपुरावा केला. त्यातून मंजूर झालेल्या ७.२९ कोटींच्या निधीतून परिसरातील इतर बंधाऱ्यांची दुरुस्तीची कामेही टप्प्याटप्प्याने मार्गी लागणार आहेत.

बंधाऱ्यांच्या दुरुस्तीमुळे उपलब्ध जलस्रोत अधिक सक्षम होऊन शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्यास, भूजल पातळी सुधारण्यास आणि पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास मदत होणार आहे. हिंगणी बंधाऱ्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीला बळ आणि परिसराच्या विकासाला गती देण्याच्या दिशेने हिंगणी बंधाऱ्याची दुरुस्ती महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.या महत्वाच्या कामाबद्दल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा विभाग व राज्य सरकारचे आभार मानले आहे.


