शेवगाव प्रतिनिधी, दि. ३१ : येथील भारदे विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक उमेश घेवरीकर यांनी दिगदर्शित केलेल्या व याच शाळेतील डॉ. सपना कुलकर्णी यांची संकल्पना, कथा व संवाद असलेल्या ‘संप्रदानम’ या संस्कृत लघुपटाने संस्कृत भारती या संस्थेने आयोजित केलेल्या चवथ्या विश्व संस्कृत लघुपट महोत्सवात या लघुपटाने दोन पुरस्कारासह स्पेशल ज्युरी अवॉर्ड देखील पटकावले. तसेच या लघुपटातील प्रमुख भूमिकेसाठी विद्या जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
अवयवदानाचे महत्व अधोरेखित करणारा अवघ्या सात मिनिटांचा हा लघुपट असून कोणतीही आधुनिक साधने हाताशी नसताना अडचणींवर मात करत शेवगाव सारख्या ग्रामीण भागातील कलाकारांनी घेतलेली ही आंतरराष्ट्रीय महोत्सवातील झेप शेवगावची शान उंचावणारी आहे.
या महोत्सवात जगभरातील शंभराहून अधिक लघुपट दाखल झाले होते. त्यातील आठ लघुपटांचे प्रदर्शन शुक्रवारी दि. २७ जानेवारी रोजी नागपूर येथील रेशीम बाग येथे करण्यात आले. या समारंभात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विद्या जोशी, संकेत खेडकर, विराज अवचिते, सपना कुलकर्णी यांनी मुख्य भूमिका साकारल्या असून लघुपटाच्या तांत्रिक बाबी कृष्णा जवरे, सोमा शिंदे, सारंग देशपांडे यांनी सांभाळल्या आहेत. या पुरस्काराबद्दल माजी प्राचार्य रमेश भारदे, एजाज काझी, हरीश भारदे, बापूसाहेब गवळी, भाऊ काळे, श्रीकांत कुलकर्णी, डॉ.मंजुषा कुलकर्णी यांच्या सह कलाक्षेत्रातील जाणकारांनी निर्माते व कलाकारांचे अभिनंदन केले आहे.