धर्म, संस्कृती टिकविण्यासाठी समाज बांधवांनी एकसंघ व्हावे – भगवंत पाठक

कोपरगाव प्रतिनिधी, दि.३१: ग्रामीण भागात कोपरगाव ब्राम्हण सभेने उभारलेली भव्य वास्तूचे काम प्रशंसनीय आहे. धर्म आणि संस्कृतीची जपवणूक करण्याची जबाबदारी समाजावर आहे. समाजाविषयी द्वेषभावना बाळगणारे विशिष्ट घटक कार्यरत आहेत. अश्यावेळी समाज बांधवांनी एकत्र येवून संस्कृती टिकविणे आवश्यक आहे. सर्वांनी अंतर्मनाला साद घालून एकत्र यावे तरच समाजातील युवक-युवतींचे भवितव्य राहील असे प्रतिपादन ब्राम्हण महासंघ (नाशिक) शहराध्यक्ष भगवंत पाठक यांनी केले.

कोपरगाव ब्राम्हण सभा आयोजित स्नेहसंमेलन, गुणगौरव, तिळगुळसोहळ्या प्रसंगी अध्यक्षपदावरून पाठक बोलत होते. व्यासपीठावर अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेचे कार्याध्यक्ष उदय मुंगी, कार्यवाह सुभाष सबनीस, प्रवीण कुलकर्णी, सुधाप्पा कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई ,ऐश्वर्या सातभाई, अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर, बांधकाम व्यवसायिक प्रसाद नाईक, दीपक एकबोटे आदि उपस्थित होते.

स्नेहसंमेलन प्रसंगी समाज बांधवांनी सादर केलेल्या कलाविष्काराला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. शारदा संगीत विद्यालयाचे संचालक केतन व दिपाली कुलकर्णी, नादब्रह्मचे विकास किर्लोस्कर, संजय कुलकर्णी यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण दुरचित्र वाहिनीवरील गायिका सुरभी कुलकर्णीने आपल्या जादुई आवाजाने तर व्हायोलीन वादक प्रसाद ओतूरकर यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी ब्राम्हण सभेचे  पदाधिकारी, जेष्ठ, महिला, बांधवाची उपस्थित होती. ४० वर्षापूर्वी स्थापन झालेल्या ब्राम्हण सभेच्या कार्याचा आढावा घेणारी फोटो गॅलरी लक्षवेधी ठरली. उद्य मुंगी, प्रवीण कुलकर्णी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. आभार जयेश बडवे यांनी मानले.