जपानमध्ये चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या देणार – मसॅतो सॅम्पेई

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : जपानमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आहे, परंतु ते आधुनिक तंत्रज्ञान इंडस्ट्रीजमध्ये वापरण्यासाठी तरूण मनुष्यबळाची कमी आहे. येथिल विद्यार्थ्यांनी आपापल्या अभियांत्रिकी शाखेच्या ज्ञानाबरोबरच जपानी भाषा किमान एन थ्री लेव्हल पर्यंत शिकावी. सुरूवातीलाच भारतीय चलनानुसार रू २० ते ३५ लाख वार्षिक पॅकेजची नोकरी जपानमध्ये मिळेल, असे प्रतिपादन एशिया टू जपान या कंपनीचे चिफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर (सीओई) मसॅतो सॅम्पेई यांनी केले.

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने जपानी भाषेचे प्रशिक्षण देणाऱ्या हिरामेकी सोल्युशन्स या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. आणि हिरामेकी सोल्युशन्सची एशिया टू जपान या जपान मधिल विविध इंडस्ट्रीजला कुशल इंजिनिअर्स पुरविणाऱ्या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातुन सीओई मसॅतो सॅम्पेई यांनी संजीवनी कॉलेजला भेट दिली असता संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.

यानंतर मसॅतो सॅम्पेई यांनी विभाग प्रमुख व जपानी भाषेचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  केले. सदर उपक्रम संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरॅक्शन विभागाचे डीन प्रा. अतुल मोकळ यांच्या पुढाकारने पार पडला. यावेळी हिरामेकी सोल्युशन्सचे डायरेक्टर प्रज्वल चन्नागिरीही उपस्थित होते.

प्रारंभी डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर म्हणाले की, संजीवनी विद्यार्थ्यांना देश परदेशात नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवुन देण्यासाठी व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबविले जातात. त्या प्रत्येक उपक्रमातुन चांगली फलनिष्पत्ती मिळत आहे. जपानी भाषा शिकण्यासाठी प्रशिक्षण देणे तर चालुच आहे, परंतु विद्यार्थ्यांनी परस्परांशी जपानी भाषेतून संवाद साधुन भाषेवरील प्रभुत्व वाढवावे, असे डॉ. ठाकुर म्हणाले.

मसॅतो सॅम्पेई पुढे म्हणाले की, एशिया टू जपान कंपनीतर्फे फास्ट ऑफर इंटरनॅशनल हा उपक्रम राबविला जातो. जपान देशात कुशल तरूणांची गरज आहे. भारत व जपान या दोन देशात भारताकडून कुशल तरूण मिळण्यासाठी करार झाला आहे. फास्ट ऑफर इंटरनॅशनल या उपक्रमांतर्गत २०२३ मध्ये भारतातील ३०० पेक्षा अधिक इंजिनिअर्सला नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या देण्यात आल्या, यात संजीवनीच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २०२४ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सात पटीने कंपन्यांची मागणी असल्यामुळे सध्या जपानी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे.

आमच्याशी २५० पेक्षा अधिक कंपन्या संलग्न असुन एकदा कंपनीत रूजु झाले ती नोकरी कायम असते, असे मसॅतो सॅम्पेई शेवटी म्हणाले. यावेळी जपानी भाषेचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी असक्खलित जपानी भाषेतून प्रश्न विचारले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असुन माजी मंत्री व संस्थेचे संस्थापक स्व.शंकरराव कोल्हे यांनी ४० वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील युवक युवतींच्या रोजगाराविषयीचे पाहीलेले स्वप्न अधिक वेगाने पुर्ण होत आहे असे प्रतिपादन केले.