ग्रामविकासासाठी लोकांचे मानसिक परिवर्तन आवश्यक :  भास्कर पेरे

शेवगाव प्रतिनिधी,दि.१७ : गावाच्या विकासासाठी स्वच्छ पाणी, झाडे, स्वच्छता, शिक्षण आणि वयस्कर माणसांचा सांभाळ ही पंचसूत्री महत्वाची असल्याचे प्रतिपादन आदर्श गाव पाटोद्याचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी केले.

माझी वसुंधरा अभियानात सलग दुसऱ्यादा राज्यात प्रथम आलेल्या शेवगाव तालुक्यातील आदर्श गाव वाघोली येथे आयोजित न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पेरे म्हणाले, प्रत्येक गावामध्ये शोष खड्डा, पाणी अडवा पाणी जिरवा, जलसंधारण, वृक्षलागवड या सारखी कामे आवश्यक असतात.

त्यामुळे स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा मिळते. वाढदिवस, वर्षश्रद्धा अशा प्रसंगी गावात किमान एखादे फळाचे झाडे लावावे. त्यामुळे केमिकल विरहीत फळे  सर्व गावकऱ्याना मिळतील. माणसांनी माणसासारखे वागले पाहिजे. गर्व, अहंकार बाजूला सोडून गावकरी, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी गावाच्या विकासाचा विचार करून संगनमताने काम केले तर गावाचा विकास निश्चित होऊ शकतो.

आदर्श गाव वाघोलीचे प्रणेते उमेश भालसिंग यांनी गावातील विकास व माझी वसुंधरा अभियान कशा पद्धतीने राबविला याची माहिती देऊन गावाच्या वतीने सर्वांचे स्वागत केले. अ.जि.म.शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारणी सदस्य डॉ.बाळकृष्ण मरकड, दिगंबर भदाणे यांचीही भाषणे झाली. यावेळी  संस्थेच्या सदस्या निर्मला काटे, सेवा योजना प्रमुख डॉ. संदीप मिरे, सरपंच सुस्मिता भालसिंग, उपसरपंच नालाबाई आल्हाट, ग्रामपंचायत सर्व सदस्य,

उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, डॉ. उषा शेरखाने, डॉ. रवींद्र वैद्य, प्रा. मोहन वेताळ, प्रा. मिनाक्षी चक्रे, प्रा. अश्विनी गोरखे, डॉ. हेमंत गायकवाड व राष्ट्रीय सेवा योजनेचे १२५ स्वयंसेवक उपस्थित होते. प्रा. पुरुषोत्तम कुंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अनिता आढाव यांनी सुत्रसंचलन केले तर डॉ. गोकुळ क्षीरसागर यांनी आभार मानले.