समाजातील तेढ, सुव्यवस्थेच्या संदर्भात शांतता कमिटीची बैठक संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : शहरातील वातावरण तणावपूर्ण होऊन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, महानंदचे चेअरमन राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, प्रदीप देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शांतता समितीच्या सदस्यांसह समाज बांधवांनी एकमेकांशी संवाद साधत भावना व्यक्त केल्या. काळे-कोल्हे कुटुंबीय तालुक्याचे पालक आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी कुठल्याही पक्षात असो विचारांचे मतभेद असताना दोन समाजात तेढ निर्माण झाल्यास त्यांची मध्यस्थी अंतिम मानली गेली आहे. शहराच्या शांततेला गालबोट लावणार्यांचा शोध पोलिसानी घ्यावा.

कोपरगाव शहराला कोणी टार्गेट करते आहे का याचा शोध घेऊन कारवाई करा. बाहेरून आलेले काही लोक शांततेला गालबोट लावत आहेत. वर्षानुवर्षे एकोप्याने राहणाऱ्या शहरवासीयांनी बाजारपेठेवर परिणाम होणार नाही याकडे हि लक्ष द्यावे. गावगुंडांची जात न पाहता कारवाई करा असे विचार अनेकांनी व्यक्त केले.

आमदार आशुतोष काळे यावेळी म्हणाले, तालुक्यातील बेकायदेशीर धंद्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. जो कोणी आरोपीं असेल त्याचा शोध घेऊन कडक कठोर कारवाई झाली पाहिजे. तरच शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. आज एका धर्मग्रंथची विटंबना झाली उद्या आणखी कोणत्या होईल. सरसखट धर्माला दोषी धरू नये त्यामुळे वातावरण बिघडते.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, शहराची शांतता राखन्याचे काम केवळ पोलीस, प्रशासनाचे नसून आपली देखील नागरिक म्हणून जबाबदारी आहे. महिलेवर अत्याचार, अन्याय झाल्यास आरोपी कुठल्या का जाती-धर्माचा असेना त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. धर्माभिमान असला तरी धर्मांध होऊ नका असा सल्ला हि कोल्हे यांनी यावेळी दिला.

 माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले, हिंदू जनआक्रोश मोर्चा का निघाला याचा विचार व्हावा. लव्हजिहादच्या केवळ एक घटना नसून अनेक आहेत. धर्मग्रंथ विटंबना प्रकरणी शासनाने कठोर कारवाई करावी. राज्यात गोहत्या बंदी कायदा असताना शहरात घरामध्ये राजरोस गोहत्या केली जाते. त्या तातडीने बंद करा अन्यथा या वर्षी गणेश विसर्जन केले जाणार नाही असा इशारा वहाडणे यांनी यावेळी दिला.

 जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, सोशल मिडियावर पोस्ट टाकताना भान ठेवा. घरातील तरुण युवकांकडे कुटुंबीयांनी लक्ष द्यावे. ते कोणाच्या सानिध्यात राहतात. कोणाशी बोलतात हे पाहावे. समाजकंटकाना जात, धर्म, पंथ नसतो. ते फक्त समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करतात. कोळगाव थडी प्रकरणी लवकरच आरोपीला पकडून कठोर शासन केले जाईल.

सर्व धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. वारंवार गोहत्या कायदा मोडणाऱ्या आरोपींना सोडणार नाही. येणाऱ्या विविध सणांच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकाचे तडीपारीचे प्रस्ताव करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. गुन्हा घडल्यानंतर सर्व समाज पोलीस ठाण्यावर एकत्र येतो हे चांगले नाही. पोलीस कोणावर हि अन्याय न करता कारवाई करतील. यावेळी शिवसेनेचे कैलास जाधव, अस्लम शेख, जितेंद्र रणशूर, अकबर शेख, मेहमूद सय्यद, शफिक शेख आदींनी सहभाग नोंदवला.