कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यातील रिक्त पदे भरा -स्नेहलता कोल्हे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस बळ अपुरे असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढला आहे. वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात रिक्त असलेली एकूण २५ पदे भरण्यासाठी आपण यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. यामध्ये आपण वैयक्तिक लक्ष घालून ही रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार व भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेशकुमार ओला यांच्याकडे केली आहे.

Mypage

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेशकुमार ओला हे शुक्रवारी (२५ ऑगस्ट) कोपरगाव येथे आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीसाठी आले असता, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्याकडे उपरोक्त मागणी केली. याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके, कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश येशीकर हेही उपस्थित होते.

Mypage

कोपरगाव शहर व तालुक्यातील जनता शांतताप्रिय आहे. यापूर्वी कधीही कोपरगावात सामाजिक तेढ निर्माण होऊन वातावरण दूषित झालेले नाही; पण अलीकडे काही घटक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन कोपरगाव तालुक्यात सामाजिक एकता व बंधुभाव अबाधित ठेवण्याचे काम केले. सामाजिक ऐक्य व शांतता टिकवून ठेवण्यातच आपल्या सर्वांचे हित आहे. प्रत्येकाने आपला आपला धर्म जपावा मात्र त्यातून शांतता देखील जपावी. – माजी आमदार स्नेहलता कोल्हे

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, यापूर्वी कोपरगाव शहर आणि तालुक्यासाठी एकच पोलिस ठाणे कार्यरत होते. वाढती लोकसंख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोपरगाव शहर व ग्रामीण (तालुका) अशा दोन स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. सद्य:स्थितीत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात ३ पोलिस अधिकारी, ४१ कर्मचारी कार्यरत असून, ११ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

Mypage

कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात २ अधिकारी कार्यरत असून, त्यापैकी एका अधिकाऱ्याची बदली झाली आहे, तर ३९ पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. ग्रामीण पोलिस ठाण्यात १ सहाय्यक पोलिस निरीक्षक व २ पोलिस उपनिरीक्षक अशा ३ पोलिस अधिकाऱ्यांची व १४ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. दोन्ही पोलिस ठाण्यांमध्ये एकूण २५ पदे रिक्त आहेत.

Mypage

कोपरगाव हे नगर-मनमाड महामार्गावर वसलेले आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांत चोऱ्या, घरफोड्या व इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. काही समाजकंटकाकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वेळी वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी तसेच आगामी काळातील सण, उत्सव लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात पुरेशी कुमक असणे अत्यावश्यक आहे.

Mypage

सध्या कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात उपलब्ध असलेले मनुष्यबळ अत्यंत अपुरे आहे. लोकसंख्या व गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामकाज, विविध गुन्ह्यांचा तपास, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी व सण, उत्सव, मिरवणूक आदी कार्यक्रमांसाठी बंदोबस्त आदी कामे पार पाडताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी पोलिस यंत्रणेवरचा ताण वाढत आहे.

Mypage

त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरण्याची आवश्यकता असल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेशकुमार ओला यांच्या निदर्शनास आणून दिले. कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यातील रिक्त पदे भरण्यासंबंधी आपण यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला असून, याबाबत त्वरित योग्य कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी ओला यांच्याकडे केली आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *