शेवगावात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत, ५ ते ६ तास वाहतूक बंद

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : शेवगाव परिसरासह तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, चापडगाव, मंडळातील अनेक गावांना सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीने  झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

     यावेळी विज व ढगांच्या कडकडटासह पावसाचे जोरदार आगमन झाले. ओढया नाल्यांना महापूर आल्याने शेवगाव गेवराई, शेवगाव -मिरी मार्गे नगर, भातकुडगाव -बक्तरपूर मार्ग रात्री पाच  ते सहा तास बंद होते. अनेक प्रवाशांना गाडीत रात्र जागवून काढावी लागली. पाणी ओसरल्या वर रहदारी सुरू झाली.

बक्तरपूर नाल्यावर सकाळी पाणी ओसरल्याचा अंदाज चुकल्याने मठाच्या वाडीच्या संतोष काटे या युवकाने पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात घातलेला टेम्पो पाण्याच्या जोराने ओढयात ओढला जाऊन पलटी झाला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. ओढ्याकाठी असलेल्या ग्रामस्थानी वाहून जात असलेला टेम्पो आडवून ओढून बाहेर काढला.

     पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तसेच अनेक दुकानात व घरात पाणी घुसल्याने नुकसान.  झाल्याच्या तक्रारी आहेत. सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास सुरू झालेला पाऊस मंगळवारी सकाळी १०पर्यंत सरू होता. तहसीलदार छगनराव वाघ, गट विकास अधिकारी महेश डोके, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहूल कदम यांनी विविध गावांना भेटी देवून पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. 

तहसीलदार वाघ यांनी तलाठ्याची बैठक घेऊन  नुकसानिचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. आज मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासात तालुक्यात मंडल निहाय झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे, शेवगाव ९८ मिमी, बोधेगाव  ९५मिमी, चापडगाव ८८ मिमी, ढोरजळगाव ३४ मिमी, भातकुडगाव १९ मिमी,  तर  एरंडगाव १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.