कोपरगावच्या खंदकनाल्यामुळे पुर रेषेची कक्षा वाढली

खंदकनाला ठरतोय कोपरगावच्या विकास आराखड्यात आडकाठी

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव शहराच्या मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी सर्वप्रथम खंदकनाल्यातुन घुसते. गोदावरी नदी थोडी दूथडी भरुन वाहती झाली तरी शहराच्या मुख्य रस्त्यावर खंदक नाल्यातून नदीचे पाणी येते. पुर्वी २ लाख क्युसेक पाणी नदीला आले तरी शहरात महापुराची स्थिती होत नव्हती. पण सन २००६ च्या महापुरानंतर हल्ली गोदावरी नदीला दिड लाख क्यूसेक पाणी आले तरी गोदावरी नदीचे पाणी खंदक नाल्यातुन कोपरगाव शहरात घुसते.

शहराच्या मुख्य भागातील व उपनगराच्या  गटारींचे सांडपाणी सर्वाधिक खंदक नाल्यातुन गोदावरी नदीच्या पाञात जाते.  शहराच्या शेजारच्या खेडेगावातील ओढ्या नाल्याचे पाणी खंदक नाल्याला येवून मिळते. खंदकनाला शहराच्या मध्यवर्ती भागात रूंदावला आहे. नदीपासून तब्बल दिड किलोमीटर अंतरावर सर्वाधिक रूंदावला आहे. माञ काही नागरीकांनी याच खंदक नाल्यावर व शेजारी खेटुन बांधकाम केल्याने काही भागात याचा प्रवाह लुप्त झाला आहे.

ऐन पावसाळ्यात किंवा नदीला वाढीव पाणी आल्यानंतर नाल्याच्या पाण्याचा प्रवाह नदीकडे होण्याऐवजी तो पाठीमागे पाण्याचा प्रवाह दाबला जातो म्हणूनच पाण्याचा फुगवटा होवुन ते पाणी शहराच्या मुख्य रस्त्यावर आणि नागरीकांच्या दुकानात घरात घुसते.  ८ मिटर रुंद असलेला हा खंदक नाला नदी पाञाच्याजवळ नदीच्या नदीच्या खोली इतका झाला आहे. नदीपाञापेक्षा थोडा उंचावरुन प्रवाह असता आणि त्याचा प्रवाह एकसारखा असता तर कदाचित कोपरगाव शहरात पाणी येण्याची शक्यता कमी असती.

 पुवी गोदावरी पाञात मोठ्या प्रमाणात वाळु होती तेव्हा नदीचे पाणी खंदक नाल्यात आले असते तर ठिक होते पण आता वाळू तस्करांच्या कृपेने गोदावरी नदीचे पाञ भलतेच खोल व रूद झाले आहे. नदीपाञात पुर्वीपेक्षा दुप्पट पाण्याचा प्रवाह वाढला तरी गोदावरी नदीचा छोटा पुल पाण्याखाली जात नाही. तसेच गोदावरी नदीला महापूर आल्यानंतर कोपरगावकरांना  जूनी गंगा जवळील सांडव्यामुळे जीवदान मिळते आणि पूराच्या पाण्याचा निचरा होतो. पुर्वी जुनीगंगा येथील सांडव्याचे पाणी जाण्यासाठी छोट्या नळ्या होत्या आता त्या ठिकाणी मोठे दोन बोगदे केल्यामुळे तेथून पूराचे पाणी मोठ्या प्रमाणात जाण्याचा मार्ग सुखकर झाला आहे. नदीचे पाञ मोठे व खोल झाले, बोगदे मोठे झाले पण खंदकला काही ठिकाणी अति खोल तर काही ठिकाणी भुईसपाट केल्यामुळे कोपरगावच्या पूराची सिमा खंदकनाल्यामुळे वाढली आहे.

 दरम्यान खंदक नाल्याचे पाणी बहुतांश भागात शिरत असल्याने  बाजारपेठेला आर्थीक फटका बसतोय. याच नाल्यावरून शहराची पूररेषा वाढली आहे.  पालीका प्रशासनाने खंदक नाल्यातून येणाऱ्या पाण्यावर योग्य उपाय योजना करुन शहराची वाढलेली पूररेषा कमी करावी. कोपरगाव शहराच्या सर्वांगिण विकासाला खंदकनाल्याचे पाणी आडकाठी ठरत आहे. शहरातील दीड किलोमीटर अंतरावरील हा नाला दोन्ही बाजूनी आरसीसी मध्ये बांधून बंदीस्त करावे. नदी काठी उंचावरुन नाल्याचे पाणी जाईल अशी व्यवस्था केली तर कोपरगाव शहराला पूर येण्याची शक्यता अतिशय कमी होईल.

खंदकनाल्याचे योग्य नियोजन केले तर नदीला कितीही पाणी आले तरी शहराच्या मुख्य बाजारपेठेत पाणी घुसणार नाही.  नदी पाञा जवळचा भाग वगळता कदाचित कोपरगाव शहराला महापूर येणारच नाही. एक खंदक नाला कोपरगाव शहरातील नागरीकांच्या नाका तोंडात पाणी आणतो आता त्या नाल्याची योग्य खबरदारी घेणे प्रशासनाच्या व नागरीकांच्या हातात आहे. विकास आराखड्यात पूररेषा किती बाधक आहे  हे गेल्या वीस वर्षापासुन अनेक मालमत्ताधारकांनी अनुभवले आहे. शहरात नेहमी पूर येतो, वाढती लोकसंख्या नागरीकांच्या भौतिक सुखसुविधांसाठी पालीका प्रशासना विसकास आराखडा तयार करताना अनेक भूखंडावर आरक्षण निश्चित करते पण पूर स्थिती का उद्भवते यावर सकारात्मक विचार करुन कायमस्वरूपी मार्ग काढला तर नदीच्या प्रवाहाचे पाणी आणि शहराचा विकास दोन्ही गती पुढे धावेल 

गोदावरी नदीला महापूर आल्यानंतर  कोपरगावचा खंदकनाला कोपरगावकरांना सर्वाधिक बुडवतो तर जुनीगंगा आजपर्यंत फक्त वाचवण्याचे काम करते. कोपरगावच्या या दोन प्रवाहाचा हा चमत्कार आहे.