श्रीगणेश कारखान्याने यंदाच्या हंगामात ३.२५ लाख मे. टन गाळपाचे नियोजन करावे 

आमदार थोरात, कोल्हे यांची संचालक मंडळ, अधिकाऱ्यांना सूचना

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : गणेशनगर येथील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस बऱ्यापैकी उपलब्ध आहे. ‘गणेश’ ला यंदा उसाची कमतरता जाणवणार नाही, असे वाटते. त्यामुळे गणेश कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामात ३.२५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून त्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना गणेश कारखान्याचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी गणेश कारखान्याच्या संचालक मंडळास व अधिकाऱ्यांना केली.

आ. बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी रविवारी (२३ जुलै) राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील श्री गणेश सहकारी साखर कारखान्यास भेट दिली. यावेळी आ. थोरात व कोल्हे यांच्या हस्ते गणेश साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाचे विधिवत पूजन करण्यात आले. गणेश कारखान्याचा पेट्रोल पंप मध्यंतरी निवडणूक प्रक्रिया व इतर काही कारणांमुळे बंद होता. आता हा पेट्रोल पंप पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. याप्रसंगी आ. थोरात व कोल्हे यांच्या हस्ते गणेश कारखाना परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. त्यानंतर आ. थोरात व कोल्हे यांनी गणेश कारखान्याच्या संचालक मंडळाची आणि अधिकाऱ्यांची व विभागप्रमुखांची बैठक घेतली. 

या बैठकीस गणेश साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक नारायणराव कार्ले, माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, संचालक बाबासाहेब डांगे, अनिल गाढवे, अनिल टिळेकर, संपतराव चौधरी, नानासाहेब नळे, महेंद्र गोर्डे, आलेश कापसे, बाळासाहेब चोळके, संपतराव हिंगे, मधुकर सातव, गंगाधर डांगे,

शोभाताई गोंदकर, कमलबाई धनवटे, अरुंधती फोपसे, विष्णुपंत शेळके, बलराज धनवटे, संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक (साखर) शिवाजीराव दिवटे, गणेश साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक नितीन भोसले यांच्यासह सर्व खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत आ. बाळासाहेब थोरात व विवेकभैय्या कोल्हे यांनी गणेश कारखाना कार्यक्षेत्रातील उसाचा आढावा घेतला. यावर्षी गणेश साखर कारखान्याला गाळपासाठी मुबलक प्रमाणात ऊस मिळणार आहे. त्यामुळे कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी गाळपाकरिता ऊस मिळविण्यासाठी आणि दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करावे. ऊस वाढीसाठी गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आणि कार्यक्षेत्राबाहेर शेतकरी मेळावे घ्यावेत व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

यासाठी  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही आ. बाळासाहेब थोरात व विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली. गणेश कारखान्याच्या परिसरात संचालक मंडळाने वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या वृक्षांची योग्य प्रकारे निगा राखून त्यांचे संवर्धन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले, गणेश साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सभासद शेतकऱ्यांनी श्री गणेश परिवर्तन मंडळाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून कारखान्याची सत्ता आपल्या हाती दिली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाने सभासदांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून चांगल्या प्रकारे कारखाना चालवावा. गणेश कारखान्याचे सभासद, शेतकरी व कामगार यांनी कारखान्यासाठी चांगले योगदान दिलेले आहे. कारखान्याच्या प्रगतीसाठी यापुढील काळातही त्यांच्याकडून असेच सहकार्य अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस गणेश कारखान्याला द्यावा. राहाता तालुक्यातील इतर साखर कारखान्यांपेक्षा गणेश कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला ५० रुपये तरी जास्त भाव नक्की देईल, असे सांगून सभासद शेतकरी, कामगारांचे हित जोपासून गणेश कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ, अशी ग्वाही कोल्हे यांनी दिली.