जीवनाकडे खिलाडूवृत्तीने पहा – अतिरीक्त पोलीस अधिक्षिक भोर

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २२ : विविध खेळांच्या स्पर्धेत स्पर्धा म्हणुन न खेळता खेळ म्हणुन खेळावे. स्पर्धेत हारजीत होते तर खेळातुन आनंद मिळतो. सांघिक आणि वैयक्तिक खेळातुन जीवनाला शिस्त लागतेे, जे खेळाडू असतात ते जीवनात शिस्तीने वागुन यशस्वी होतात, असे प्रतिपादन श्रीरामपुर विभागाच्या अतिरीक्त पोलीस अधिक्षिका स्वाती भोर यांनी केले.

संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक आयोजीत व इंटर इंजिनिअरींग स्टूडंटस् स्पोर्टस् (आयईडीएसएसए), महाराष्ट्र  राज्य प्रायोजीत डब्ल्यु ५ झोन अंतर्गत अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, धुळे व नंदुरबार या सहा जिल्ह्यातील  पाॅलीटेक्निक व डी फार्मसी संस्थांमधिल मुलींच्या विविध क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणुन भोर बोलत होत्या. संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांनी या शानदार सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविले.

यावेळी व्यासपीठावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सचिव ए. डी. अंत्रे, डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य ए. आर. मिरीकर, क्रीडा स्पर्धांच्या समन्वयीका प्रा. मोहिनी गुंजाळ व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. या भव्य क्रीडा स्पर्धांसाठी सुमारे ५५ संस्थांमधुन सुमारे ८५० मुलींनी वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

प्रारंभी प्राचार्य मिरीकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून आयईडीएसएसए व संजीवनी पाॅलीटेक्निकची थोडक्यात माहिती देवुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित सर्वच संस्थांनी दर्जा व गुणवत्तेच्या जोरावर नावलौकिक प्राप्त केला असल्याचे सांगीतले.

भोर पुढे म्हणाल्या की, खेळाने शारीरिक  व मानसिक स्वास्थ राहते, आणि निरोगी शरीरात निरोगी मन राहते. पोलीस दलाकडे रोज एकतरी आत्महत्येची केस नोंद होते ही दुर्दवी बाब असुन अशा व्यक्ती जीवनाकडे खिलाडूवृत्तीने बघत नाही, आणि हताश होवुन मृत्युला कवटाळतात. यासाठी हार सुध्दा पचविण्याची क्षमता केवळ खेळातुनच निर्माण होते. हरणाऱ्यांनी जींकणारांचे अभिनंदन करण्याची संस्कुती जोपासावी, कोणतीही हार हा शेवट नसतो, मात्र जीवनात सकारात्मकतेने जगा असा सल्ला भोर यांनी शेवटी दिला.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देवुन सांगीतले की, संजीवनी शैक्षणिक  बाबींबरोबरच खेळालाही तितकेच महत्व देते, आणि म्हणुनच २०१९- २०  या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील  सर्व पाॅलीटेक्निक व डी. फार्मसी संस्थांमधुन सर्व क्रीडा प्रकारांमध्ये  सहभाग नोंदवुन व जिंकुन संजीवनी पाॅलीटेक्निकने दुसरा क्रमांक पटकाविला.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना डाॅ. मनाली कोल्हे म्हणाल्या की आजच्या स्पर्धात्मक युगात खुप व्यक्तींना मानसिक तानतणाव सहन होत नाही. परंतु जो खेळाडू असतो त्यांच्या अंगी नेतृत्वगुण, टीम वर्क, हार्डवर्क आणि सातत्य या गुणांची रूजवण होते, ते अपयशाला बळी पडत नाही, आणि पुन्हा जिध्दीने प्रयत्न करतात. आपल्या ध्येयापासुन कोणीही आपल्याला रोखु शकत नाही मात्र जिध्द आणि चिकाटी पाहीजे. बॅडमिंटन खेळाडू सानिया नेहवाल, फ्रीस्टाईल कुस्ती पटू गीता फोगट व साक्षी मलिक, मुष्ठीयोध्या मेरी कोम व क्रिकेटर मिताली राज यांचा आदर्श डोळ्यासमोर समोर ठेवुन आपले क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य आत्मसात करावे, याही क्षेत्रात मुलींना करीअर करण्याच्या भरपुर संधी आहेत, असे डाॅ. कोल्हे शेवटी म्हणाल्या.

आयईडीएसएसए व संजीवनी संस्थांच्या ध्वजाचे ध्वजारोहण, मान्यवरांच्या हस्ते मशाल ज्योत प्रज्वलन, खेळाडूंचे संचलन व मानवंदना, संपुर्ण मैदानावर लाॅन असल्यामुळे हिरवा गालीच्या सारखे सपुर्ण भव्य मैदान, मैदानाच्या सर्व बाजुंनी  विस्तिर्ण हिरवीगार झाडी आणि सकाळचे सौम्य ऊण आणि थंडीचा थोडासा गारवा, या सर्व बाबींमुळे उद्घाटन सोहळा संस्मरणीय झाल्याचे अनेक खेळाडू व संघनायकांनी सांगीतले. कु. स्मृती दवंगे हीने खेळाडूंना शपथ दिली. प्रा. साहेबराव दवंगे यांनी सुत्रसंचलन केले, तर प्रा. मोहिनी गुंजाळ यांनी आभार मानले.