वरूर येथे कॅन्डल मोर्चा, निंबेनांदूर गाव बंद

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०२ : मराठा भूषण मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणाला पाठिंबा म्हणून तालुक्यातील धाकटी पंढरी क्षेत्र वरूरच्या सकल मराठा समाजाच्या वतीने रात्री कॅण्डल मोर्च्या काढून तसेच एक दिवशीय अन्नपाण्याविना लाक्षणिक उपोषण करून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली.

त्यानंतर उपोषणास प्रारंभ झाला. वरूर बुद्रुक व वरूर खुर्द येथील सकल मराठा समाज बांधव लाक्षणिक उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तरुण कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी तसेच महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. अन्य समाज बांधवांनीही पाठिंबा देत उपोषणस्थळी सहभाग घेतला. मराठा आरक्षणासाठी निंबेंनांदूर मध्ये पुढाऱ्यांना गावबंदी तर निंबेनांदूर मध्ये पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करून मराठा आरक्षणासाठी सर्व समाजातून पाठींबा देण्यात आला.

सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, एक मराठा लाख मराठा जय घोषात मराठा योध्या मनोज जरांगे यांच्या लढ्यास सर्वानुमते पाठींबा देण्यात आला. तर जो पर्यंत सकल मराठा बांधवांना आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सर्व राजकीय पक्ष यांच्या आजी माजी आमदार, खासदार मंत्री यांना गावात प्रवेश नाकारला गेला आहे. यावेळी निंबेनांदूर वाडी वस्तीवरील तरुण, गावातील ग्रामपंचायत, सोसायटी सह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला मोठा फटका, शेवगाव आगारातील सर्व एसटी गाड्या बंद प्रवासी, नोकरदार,विद्यार्थ्याचे अतोनात हाल होत आहे. शेवगाव आगारातील वाहातूक सेवा मंगळवार पासून पूर्णपणे बंद करण्यात आली. शेवगाव बस स्थानकातून दररोज १६० फेर्‍या केल्या जातात त्यातून आगाराला दिवसाकाठी सरासरी पाच लाख रुपये उत्पन्न मिळते. शेवगाव आगाराल्या ५० तसेच परभणी, पाथरी, अंबड गेवराई, पैठण या आगाराच्या २० असा एकूण ७० एसटी बस गाड्या सध्या आगारात उभ्या आहेत.