कोल्हे कारखाना कार्यस्थळावर उसतोडणी कामगार आरोग्य मेळावा संपन्न

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २० :  केंद्र व राज्य शासन अंतर्गत आयुष्यमान भव अभियान अंतर्गत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली उसतोडणी कामगार, महिला, चालक वाहकांसाठी साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मनेष गाडे होते. 

 प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी प्रास्तविक करतांना सांगितले की, केंद्र व राज्य स्तरावर सहकारी साखर कारखान्यांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्याची युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करत उसतोडणी कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे.

ऊस व्यवस्थापक जी.बी. शिंदे यांनी कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी कामगारांसाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या सर्व सुविधा त्याचप्रमाणे आरोग्य बाबत राबवीत असलेले उपक्रम, ऊस तोडणी कामगार विमा सहाय्य योजना, महिला व त्यांच्या लहान मुलांसाठी कारखाना व्यवस्थापन घेत असलेली काळजी याबाबत माहिती दिली.

           संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उप केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णा पवार यांनी आयुष्यमान भव अभियान अंतर्गत असंसर्गजन्य आजार, संसर्गजन्य आजार, माता बाल आरोग्य लसीकरण पोषण सल्ला, कान, नाक, घसा, सिकलसेल, दंतरोग, उपशामक सेवा, नेत्ररोग, त्वचा आजार तपासणी निदान उपचार संदर्भ सेवा, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड नोंदणी व वितरण या सर्व उपक्रमाबाबत जनजागृती करत उपस्थित सर्वं उस तोडणी कामगार, महिला, चालक वाहक आदिंची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत गोळया औषधांचे वाटप केले.

कारखान्यांचे संचालक निलेश देवकर, रमेश घोडेराव, अमृत संजीवनीचे बापूसाहेब औताडे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, उपसुरक्षा अधिकारी राजेंद्र देवकर, सलमान शेख, आदि उपस्थित होते. उस व्यवस्थापक जी. बी. शिंदे यांनी सुत्रसंचलन केले. शेवटी संचालक निलेश देवकर यांनी आभार मानले.