आमदार काळेंच्या मागणीची कृषी विभागाकडून दखल

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मंडलात प्रत्येकी एकच स्वयंचलीत हवामान केंद्र असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवून देखील असंख्य शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत होते. त्यामुळे २०२० पासून कोपरगाव मतदार संघात हवामान केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी शासनाकडे केली होती. त्या मागणीची महायुती शासनाने दखल घेवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचा निर्णय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील एका मंडलात अनेक गावे असल्यामुळे व सर्व गावे मिळून एकाच गावातील हवामान केंद्रावर होणाऱ्या पावसाच्या नोंदीनुसार शेतकऱ्यांना अतिवृष्टी अथवा दुष्काळाची नुकसान भरपाई मिळत असे. परंतु मंडलातील एका गावात पाऊस पडला तरी तो संपूर्ण मंडलात पडतोच असे नाही व एका गावात नाही पडला म्हणजे सर्वच गावात पडला नाही असे नाही. तसेच एका गावात अतिवृष्टी झाली नाही म्हणजे दुसऱ्या गावात झालेली नाही असे नाही. व अनेक वेळा या हवामान केंद्रांपैकी काही हवामान केंद्र बंद राहत असल्यामुळे असंख्य शेतकरी हवामान आधारित पीकविमा व दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित राहत होते.

हि बाब मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीच्या पाहणी दरम्यान आ.आशुतोष काळे यांच्या लक्षात आल्यामुळे  अतिवृष्टी व दुष्काळाच्या नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहु नये. पडणाऱ्या पावसाच्या अचूक आकडेवारीची नोंद कृषी, महसूल विभागाला मिळावी व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी २०२० मध्ये तात्कालीन पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मंडलात स्वयंचलीत हवामान केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी केली होती.

त्याबाबत त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर त्या पाठपुराव्याची कृषी विभागाने दखल घेतली असून राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देतांना प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात  जाहीर केले आहे. त्यामुळे यापुढे होणाऱ्या पावसाच्या अचूक आकडेवारीची नोंद कृषी व महसूल विभागाला मिळणार असून त्या-त्या गावातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे आ.आशुतोष काळे यांच्या मागणीला कृषी विभागाने सकारात्मक प्रतिसाद देवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांनी कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे व हाती घेतलेल्या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून तडीस लावणाऱ्या आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.