गायकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोपरगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर जाईल -पुष्पा काळे

कोपरगाव प्रतिनिधी,दि .२० : निसर्गाने प्रत्येकाला एक अलौकिक कला बहाल केलेली असते. या कलेला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ती कला विकसित होत जावून त्या कलेच्या माध्यमातून ती व्यक्ती स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकते. याचा प्रत्यय प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव’ स्पर्धेच्या माध्यमातून आला आहे. या स्पर्धेतील उदयोन्मुख गायकांना योग्य मार्गदर्शन व योग्य व्यासपीठ मिळाल्यास कोपरगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर जाईल असा विश्वास प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांनी व्यक्त केला.

 कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात दरवर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर स्त्री शक्तीचा’ नवरात्र उत्सव कार्यक्रमात यावर्षी विविध स्पर्धांबरोबरच नव्याने ‘सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते.

 ‘सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव’ या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहता कोपरगावमध्ये देखील प्रतिभा संपन्न कलाकार आहेत याची प्रचीती आली. स्पर्धकांनी सादर केलेली एकापेक्षा एक सरस बहारदार नवी, जुनी मराठी व हिंदी गाणी आपल्या अद्भुत ऊर्जेने सादर करणारे कलाकार व प्रत्येक गाण्याला उपस्थित रसिकांचा टाळ्यांच्या कडकडाटात मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नियोजित दोन तासाची असणारी हि स्पर्धा तब्बल पाच तास घ्यावी लागली. या पाच तास चाललेल्या स्पर्धेत कोपरगावकरानी सुरांची जादू अनुभवली.

यावेळी स्पर्धेतील सर्वच स्पर्धकांचे सौ.पुष्पा काळे यांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, कलाकारांचा उत्साह, त्यांच्यातील अलौकिक कला पाहून हे भविष्यात हे उत्कृष्ट कलाकार होतील. त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेवून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध झाल्यास संगीत क्षेत्रात देखील कोपरगावचे नाव मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ‘सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव’ हि स्पर्धा आयोजित करून गायन क्षेत्रातील हिरे शोधले आहे. यापुढे देखील अशा विविध स्पर्धा राबवून अशा कलाकारांसाठी व्यासपीठ उललब्ध करून देवू अशी ग्वाही दिली.