सर्वांगीण विकासासाठी तुमची साथ कायम माझ्या पाठीशी असू द्या – स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : जीवनात कितीही अडचणी संकटे आली तरी खचायचे, घाबरायचे, रडायचे नाही, हिमतीने लढायचे आणि पुढे जायचे. माऊली, माता या शब्दात खूप मोठी ताकद आहे. स्त्री म्हणजे लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा मातेचे रूप आहे. महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझी ऊर्जा आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन मी काम करत आहे. तुमची साथ कायम माझ्या पाठीशी असू द्या, तुमच्या मदतीसाठी, तुमचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे गुरुवारी (१९ ऑक्टोबर) रात्री आयोजित सन्मान नारी शक्तीचा ‘होम मिनिस्टर-खेळ मानाच्या पैठणीचा’ या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. करंजी येथे प्रथमच आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त व जोरदार प्रतिसाद मिळाला. स्वत: स्नेहलता कोल्हे यांनी या कार्यक्रमात सहभागी होत महिलांसोबत मनमुराद आनंद लुटला.

या कार्यक्रमात अर्चना गायकवाड, सोनाली रासकर, जयश्री मुकेश गायकवाड, मीरा फापाळे या महिला मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यातील भाग्यवान विजेत्या प्रमिला शशिकांत पवार (गॅस शेगडी), शीतलदेवी पंजाबी (मिक्सर), नंदा अशोक आगवन (टेबल फॅन), उषा आहेर (इस्त्री), किसनाबाई जाधव (डिनर सेट) यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात चित्रपट गीते, लोकगीते, भक्तिगीते, नृत्य, विनोद, गप्पा-गोष्टीबरोबरच उखाणे, तळ्यात – मळ्यात, किसमे कितना है दम, दोरा ओढणे, अभिनय व इतर विविध मनोरंजक खेळाची भरगच्च मेजवानी महिलांना मिळाली. निवेदक व सूत्रसंचालक संदीप जाधव यांनी आपल्या बहारदार कलाविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध करत कार्यक्रम उत्तरोत्तर रंगवत नेला. त्यांना गायक किरण वैराळ तर संगीताची साथ अनिल डोरगे, गोरख कोटमे, भरत जाधव, शुभम जाधव, अनिल गाडेकर, प्रमोद निकम, बाळासाहेब जाधव आदींनी दिली. 

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सर्व उपस्थित महिला व ग्रामस्थांना शुभेच्छा देऊन स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून माता-भगिनींना विरंगुळा व आनंदाचे क्षण मिळावे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने खास महिलांसाठी सन्मान नारी शक्तीचा ‘होम मिनिस्टर-खेळ मानाच्या पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन स्त्रीशक्तीचा जागर केला.

महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला खूप समाधान वाटले. सन २००० मध्ये मी महिला बचत गटापासून सामाजिक कार्य सुरू केले. मी महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना संघटित करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत केला, त्यांना आर्थिक बचतीची सवय लावून बँक व्यवहाराची माहिती करून दिली. उंबऱ्याच्या आत अडकलेल्या माता-भगिनींना समाजाच्या प्रवाहात आणले, त्यांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसाह्य करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले. समाजकारण व राजकारण करताना महिलांचे प्रश्न सोडविण्यास मी सतत प्राधान्य दिले.

माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या आदर्श विचारावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे व आपण जनसेवेचे व्रत स्वीकारले असून, कोपरगाव मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्यास जनतेने कोल्हे परिवाराला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत.

ज्या घरात महिलांचा सन्मान होतो, तेच घर प्रगती करते. पुरुषांनी महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करून महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. एकीचे बळ फार मोठे आहे. महिलांनी कोणत्याही संकटाला न घाबरता एकजुटीने व आत्मविश्वासाने सामोरे जावे. ‘आता रडायचे नाही तर लढायचे आहे’, असा संदेश देत त्यांनी स्त्रीशक्तीचा जागर केला.

प्रारंभी स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार ज्योती आगवन, छाया भिंगारे, मीनाक्षी भिंगारे, कुसुम आगवन, कल्पना भिंगारे, दीपाल भिंगारे, सुनीता भिंगारे, ईश्वरी भिंगारे, पूनम देसाई, अलका भिंगारे यांनी केला. गणेश भिंगारे व अरुण भिंगारे यांचा वाढदिवस निमित्त स्नेहलता कोल्हे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. स्नेहलता कोल्हे यांनी करंजीसारख्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच सन्मान नारी शक्तीचा ‘होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करून महिलांना कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्योती आगवन यांनी समस्त ग्रामस्थ व महिलांच्या वतीने स्नेहलता यांचे आभार मानले.

कार्यक्रमास सरपंच रवींद्र आगवन, सुवर्ण संजीवनीचे संचालक देविदास भिंगारे, शेतकरी संघाचे संचालक अरुण भिंगारे, माजी पं. स. उपसभापती नवनाथ आगवन, अजय भिंगारे, डॉ. सुनील देसाई, संतोष भिंगारे, रुक्मिणी भिंगारे, कविता कापसे, लता डोखे, सुरेखा शिंदे, आराध्य शिंदे, प्रतिभा आगवन, अल्का आगवन, निर्मला फापाळे, विमल भिंगारे, मनीषा शहाणे, गायत्री बोठे, सोनाली भिंगारे, सपना जाधव आदींसह करंजी येथील सर्व महिला बचत गट सदस्य, महिला, कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.