शेवगावात तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८: तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  तहसीलदार प्रशांत सांगडे यांना आज सोमवारी विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन देऊन संपूर्ण तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन या अस्मानी संकट प्रसंगी शेतकर्याना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की,  गेल्या दोन महिन्यापासून शेवगाव तालुक्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके जळून चालली. तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट निर्माण झालेले असतांना तालुक्याच्या सर्व गावाची आणेवारी पन्नास  पैशापेक्षा जास्त जाहीर करून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. ही बाब तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे.

एकीकडे तालुक्यातील शेवगाव, बोधेगाव व एरंडगाव अशा महसूल मंडळात पावसाचा २१ दिवसाचा खंड पडल्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करून या मंडळात २५ टक्के अग्रीम पीक विमा रक्कम  मिळण्याची मागणी करण्यात आली तर उर्वरित चापडगाव, दोरजळगाव व भातकुडगाव या तीनही मंडळांना वगळण्यात आले ही बाब अतिशय गंभीर आहे. वगळण्यात आलेल्या तिन्ही मंडळांना अग्रीम रक्कम मिळणे गरजेचे आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत महसूल प्रशासनाने नजर आणेवारी वाढवून लावली, ती त्वरित कमी करण्यात यावी.

शेतकऱ्यांना शासनाने सरसकट हेक्‍टरी २५ हजार रुपये नुकसान अनुदान जाहीर करावे. दुष्काळामुळे तालुक्यात कुठलेही पिक येणार नाही; आले तरी अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा. तसेच सुरळीत वीजपुरवठा करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी. आदी मागण्याचा निवेदनात समावेश आहे.

      यावेळी  ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे, माजी सभापती अरुण पाटील लांडे,राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समिती सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, संजय फडके, सुनिता नजन, नाना पाटील मडके, ताहेर पटेल, कमलेश लांडगे, अशोक धस, हनुमान पातकळ, प्रदीप काळे, जाकीर कुरेशी, मनोज तिवारी, रामनाथ लेंडाळ उपस्थित होते. वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता अतुल लोहारे यांनाही मागण्याचे निवेदन देण्यात आले.