महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : सध्या रब्बी पिकांना पाणी देण्याची नितांत गरज असून, हे लक्षात घेऊन महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडू नये. शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करावा. तसेच सरकारने याबाबत महावितरण कंपनीला निर्देश द्यावेत, अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

गतवर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बी हंगामात पिके घेतली. त्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस तापमान वाढते आहे.

उन्हामुळे आणि जमिनीतील खालावत चाललेली पाण्याची पातळी यामुळे पिके करपू लागली आहेत. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला व फळ पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असल्याने जे काही थोडेफार पाणी आहे तेही शेतकऱ्यांना देता येत नाही.

शेतातील उभ्या पिकांना शेवटच्या पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी रब्बी पिके हातातून जाण्यासारखी परिस्थिती आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. पिकांना पाणी देण्याची आणि त्यासाठी विजेची गरज आहे. सध्या शेतकरी अडचणीत असून, अशा अडचणीच्या काळात महावितरण कंपनीने त्यांना साथ देण्याची गरज आहे.

कृषिपंपाचे थकलेले वीजबिल वसूल करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्याकरिता थेट विद्युत रोहित्रे (डी. पी.) बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. वीज वितरण कंपनीने किमान पंधरा-वीस दिवस अगोदर पूर्वसूचना देऊन शेतकऱ्यांचा डी. पी. वरील विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करणे आवश्यक होते. वीज नियामक आयोगाने तसे आदेश दिलेले आहेत.

तसेच शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे वीज कनेक्शन तोडू नये, असा न्यायालयाचाही आदेश आहे. वीज वितरण कंपनीने थेट विद्युत रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेऊन विद्युत रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण कंपनीने तात्काळ थांबवावी, अशी मागणी विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे.

अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांना फटका बसून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. त्यात आता रब्बी पिके शेवटच्या पाण्यावर आलेली आहेत. गोदावरी डावा व उजवा कालव्याच्या आवर्तनाअभावी लाभक्षेत्रातील हातातोंडाशी आलेली गहू, कांदा, हरभरा व इतर पिके धोक्यात आली होती नुकतेच आता नुकतेच गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनातून शेतकरी आपल्या शेतातील विहिरी, शेततळे भरून घेऊन सिंचन पूर्ण करतील. आवर्तनामुळे कोरडे पडलेले लहान-मोठे तलाव, विहिरी तसेच बोअरवेलची पाणी पातळी वाढण्यासही मदत होणार आहे.

सध्या रब्बी हंगामातील पिकांना शेवटच्या पाण्याची आवश्यकता आहे. पिकांना वेळीच पाणी मिळाले नाही तर ही पिके उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई न करता शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने सुरळीत वीजपुरवठा करावा तसेच विद्युत रोहित्रांवरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तातडीने थांबवावी, अशीही मागणी विवेक कोल्हे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील गतिशील सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. सध्या पिकांना पाणी देण्यासाठी विजेची आवश्यकता आहे.

जर ही पिके शेतकऱ्यांच्या हाती आली तर मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी कृषिपंपांची वीजबिले भरू शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती ध्यानात घेऊन शेतीसाठी योग्य दाबाने अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश सरकारने विद्युत वितरण कंपनीला द्यावेत. तीन महिने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा यापूर्वीचा निर्णय या काळात कायम करावा. तसेच आजघडीला संपूर्ण थकित वीजबिल भरण्याची शेतकऱ्यांची ऐपत नसल्यामुळे महावितरण कंपनीने सध्या शेतकरी थकित वीजबिलापोटी जेवढे पैसे भरण्यास तयार आहेत तेवढे पैसे स्वीकारावेत. ही पिके व्यवस्थित होऊन त्यातून नंतर उर्वरित वीजबिल भरन्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. महावितरण कंपनीने सामंजस्याने यातून मार्ग काढावा व अंतीम पाण्यावर असलेली पिके व्यवस्थित सिंचन होण्यास सहकार्य करावे अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.