धामोरीतील गंगाधर ठाकरे यांच्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१: कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली असुन जिकडे जावे तिकडे बिबट्याच्या हल्ल्यात पळीव कुञे शेळ्या फस्त होत आहेत. आता तर चक्क बिबट्याने माणसावर लक्ष केंद्रित करुन धामोरी येथील गंगाधर  वाळीबा ठाकरे वय ७० वर्षे यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्यांना गंभिर जखमी केले.  

 या घटनेची अधिक माहिती अशी की, बुधवारी पावने तीन वाजण्याच्या दरम्यान धामोरी येथील गंगाधर ठाकरे यांच्या  खोकडमळा शिवारातील वस्तीवर  गोठ्यातील गायी हंबरण्याचा आवाज येत होता तर सोबतच कुञ्याचा आवाज येत असल्याने झोपेत असलेले गंगाधर ठाकरे हे घराबाहेर येवून पहातात छर एक बिबट्या त्यांच्या पाळीव कुञ्यावर हल्ला करुन झटाटप करीत होता हे दृष्य पाहून ठाकरे यांनी एक लोखंड पाईप घेवून बिबट्याच्या तावडीतुन कुञ्याला वाचवण्याचा प्रयत्नात असताना बिबट्याने कुञा तावडीतला सोडून गंगाधर ठाकरे यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

ठाकरे व बिबटया यांच्यात चांगलीच झुंज सुरु झाली. बिबट्याने ठाकरे यांची मान पकडण्याच्या प्रयत्नात त्यांच्या डाव्या  कानाचे, डाव्या हाताच्या काखेचे, कोपराचे लचके तोडले. तरीही ठाकरे यांची मान बिबट्याच्या जबड्यात सापडत नसल्याने चवताळलेल्या बिबट्याने ठाकरे यांचे डोके जबड्यात धरून ओढण्याचा प्रयत्न करीत होता त्यामुळे त्याचे सुळे दात ठाकरे यांच्या डोक्याच्या कवठीत आरपार गेले. घायाळ झालेल्या ठाकरे यांचा किंचाळण्याचा आवाज त्यांच्या पत्नी कुसुमबाई ठाकरे यांच्या कानी पडताच त्यांनी बॅटरी लावून आवाजाच्या दिशेने धावत गेल्या त्यांच्या सोबत नातू ज्ञानेश्वर ठाकरे हाही आला.

बॅटरीच्या प्रखर प्रकाशाने बिबट्या बिथरला आणि ठाकरे यांना सोडून पळुन गेला. गंगाधर ठाकरे हे रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडले होते. तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने गंभिर जखमी असलेल्या ठाकरे यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन यादव व वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी ठाकरे यांच्यावर तातडीने योग्य उपचार करीत जखमी ठाकरे यांच्या शरीरावरील विविध ठिकाणी ५५ टाक्या टाकुन   योग्य उपचार करीत  जीवदान दिले. 

या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन यादव म्हणाले की, गंगाधर ठाकरे या़च्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला करुन  शरीराच्या अनेक भागाचा चावा घेतल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती माञ वेळेत उपचार केल्याने त्यांची प्रकृती सध्या सुस्थितीत आहे.

 या हल्ल्या संदर्भात गंभिर  जखमी असलेले गंगाधर ठाकरे म्हणाले की, ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी दिवसा लाईट दिली जात नाही. बिबट्याचा वावर वाढल्याने आम्ही आमचा जीव मुठीत घेवून जगतोय. पाळी प्राण्या बरोबर आमच्या जीवाला धोका आहे. तेव्हा प्रशासनाने बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करुन दिवसा विजपुरवठा योग्य दाबाने करवा अन्यथा माझ्या सारख्या अनेकांवर हल्ला होणार मी थोडा धिट होतो म्हणुन बिबट्या बरोबर दोन हात केलो. माझी पत्नी व नातू  धावून आले व वेळेत उपचार मिळाला  म्हणुन किमान वाचलो असे म्हणत त्यांनी डोळ्यातुन आश्रु ढाळले. 

दरम्यान या घटनेची माहीती मिळताच वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी  प्रतिभा सोनवणे यांनी जखमी असलेले ठाकरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी उपस्थित नातेवाईकांनी वनविभागाच्या कारभारावर शेलक्या शब्दात नाराजी व्यक्त कूली तेव्हा सोनवणे म्हणाल्या मी तर काय करणार प्रत्येक गावात बिबट्यांचा वावर वाढलाय. कोपरगाव तालुक्यासाठी केवळ एक वन कर्मचारी आहे. शासनाच्या वतीने बिबटे पकडण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. पिंजरा लावण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. जिथे बिबट्या दिसेल त्या भागातील नागरीकांनी पिंजरा आणण्यासाठी गाडीची व्यवस्था करावी तरच आम्ही पिंजरा लावू शकतो. पिंजरा लावला तरी बिबट्या सापडत नाही.  

मी आल्यापासुन तालुक्यात पहील्यांदाच माणसावर बिबट्याने हल्ला केला आहे.  या तालुक्यात बागायत परिसर अधिक आहे. चोवीस तास पाण्याची सुविधा आहे. बिबट्याला लपायला जागा आहे. कुञे, डुक्कर हे बिबट्याचे मुख्य खाद्य असल्याने या भागात बिबट्याचे वास्तव वाढले आहे. कोपरगावपेक्षा श्रीरामपूर, राहत्यात सर्वात ज्यास्त बिबटे आहेत असे   म्हणत तुमच्या पेक्षा इतर ठिकाणी भयानक स्थिती आहे तेव्हा आपणच आपली काळजी घ्या आमच्यावर विसंबून राहु नका असाच सल्ला दिला. बिबट्याने पाळीव प्राणी खाल्ले असतील तर त्याची भरपाई वनविभाग देते. कोणावर प्राणघातक हल्ला झाला तर त्याचा संपूर्ण खर्च दिला जातो असे सांगून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वांची बोलती बंद केली पण बिबट्याचा बंदोबस्ता बाबत जर तर उत्तर देत निघून गेल्या.

 तालुक्यात बिबट्याचा वावर मानवी वस्तीत वाढला आहे. कोपरगाव शहराच्या लगतच्या शेतात बिबट्याचा मुक्काम असल्याने एक दिवस बिबट्या कोपरगाव शहरात दिसला तर कोणी आश्चर्य वाटून घेवू नये.