कोपरगावकरांना गढुळ पाणीसुध्दा वेळेवर मिळत नाही

धरणं काठोकाठ भरले तरी कोपरगावकरांना आठवड्यातुन एकदाच पाणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : शोषित कोपरगावच्या नागरीकांची कहानीच वेगळी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे झाली. एका बाजुला शासनाच्यावतीने संपूर्ण देशात आजादी का अमृतमहोत्सव साजरा करुन आनंद साजरा केला जातोय. नागरीकांच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी नवनवीन योजनांचा पाऊस पाडला जात असताना कोपरगाव शहरातील नागरीकांना आजही केवळ पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.  कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे सर्व धरणं काठोकाठ भरलेले असताना आजही आठवड्यातुन एकवेळ पिण्याचे पाणी मिळते हेच कोपरगावच्या नागरीकांचे दुर्देव आहे. कोणाचे चुकते कोणाचे बरोबर यावर बोलण्यापेक्षा कोणाच्या प्रयत्नातुन दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी मिळते का याचा विचार कोपरगाव शहरातील नागरीक अधिक करीत आहेत. 

सध्या आठ दिवसाड केवळ अर्धातास पाणी नळाला येत असल्याने नागरीकांना उन्हाळा येण्या आगोदरच घाम फुटला आहे. रोगराईचे प्रमाण वाढत आहे. साठवलेल्या दुषित पाण्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. आठ दिवसाड पाणी मिळते तेही मुबलक नसल्याने नागरीकांची उन्हाळ्याच्या अगोदरच तारांबळ उडाली अशातच आता उर्ध्व गोदावरी कालव्यातून उद्या पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ अर्धा तास व सहा दिवसाआड पाणी पुरवठा होणाऱ्या नागरिकांना अत्यानंद झाला  म्हणले तर वावगे वाटू नये.

कोपरगावच्या नागरीकांचा आनंद सुध्दा किती तोकडा होत आहे. पण हाही आनंद फार काळ टिकणार नाही. जरी साठवण तलावात पाणी आले तरी पुढील आवर्तन येईपर्यंत आलेले पाणी पुरवावे लागणार असल्याने धरणा बरोबर पालीकेचे साठवण तलाव  काठोकाठ भरले तरीही पालीका नागरीकांना दररोज पाणी देवू शकणार नाही. दररोज पाणी देणे तर दुरच चार दिवसाड पाणी देणे पालीकेला शक्य नसल्याची स्पष्ट कबुली पालीकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली. जर हिवाळ्यात हि स्थिती असेल तर उन्हाळ्यात काय होईल यावर विचार करण्यापेक्षा जे येईल ते आपल्या भांड्यात घ्यावे अशी अवस्था नागरीकांची झाली आहे. 

   या संदर्भात गोसावी पुढे म्हणाले, नागरीकांना पाणी पुरवठा करणे जरी पालीकेच्या हातात असले तरी पाटबंधारे विभाग जर वेळेवर पाणी सोडत नसेल तर आम्हाला साठवलेल्या पाण्यावर योग्य नियोजन करुन पाणी पुरवठा करावा लागतो. पालीकेच्या साठवण तलावात पुर्ण क्षमतेने पाणी भरले तरी पाण्याची गळती मोठी आहे. चार नंबर साठवण तलाव शंभर टक्के भरता येत नाही. कालव्याच्या वरच्या बाजुला तलाव असल्याने त्यात पाणी जात नाही. अशीच अवस्था नव्या पाचव्या तलावाची होवू नये यासाठी अगोदरच त्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न पालीका करीत आहे. त्या तलावात एक्स्प्रेस कालव्यातून पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरु आहेत अन्यथा डाव्या कालव्यातुन उपसलेले पाणी. पुन्हा पंपिंग करुन उचलावे लागणार. पाण्याची तुट भरुन काढणे पालीकेच्या समोर मोठा प्रश्न आहे 

 कालव्यातून पाणी आले तरी पालिकेच्या  साठवण तलावाची भौगोलिक रचनेमुळे पूर्ण क्षमतेने तलाव भरले जात नाहीत.   पाटबंधारे विभागाने पुढील आवर्तने कधी, कशी सोडणार याबाबत पालिकेला अजून काहीहि कळवले नाही. तरी सुद्धा साठवण तलावात पाणी आल्यावर आणखी काही नियोजन करता येईल का याबाबत अभियंतासमवेत बैठक घेऊन पुढील  निर्णय घेऊ असे गोसावी यांनी सांगुन पाटबंधारे विभागाकडे बोट केले आहे. 

 दरम्यान गोदावरी डावा तट कालवा पाटबंधारे विभागाचे अभियंता सुभाष मिसाळ यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, येत्या संपूर्ण हंगामात एकुण चार आवर्तने सोडण्यात येणार असुन सिंचना बरोबर पिण्याच्या पाण्याचे आवर्तन एकञ सोडले जाणार आहे. नियमाप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन स्वतंत्र सोडणे पाटबंधारे विभागाला शक्य होणार नाही. पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दोन्ही आवर्तन एकञ सोडण्याचे नियोजन असते अशी माहीती दिली. 

 दरम्यान पाटबंधारे विभाग त्याच्या कालव्यातील पाण्याची तुट भरुन काढण्यासाठी पिण्याचे आवर्तन गायब तर करीत नाही ना?  पालीका प्रशासनाकडून रितसर पाणीपट्टी वसुल करण्याऐवजी दुप्पट दंड लावून वसुल करणाऱ्या पाटबंधारे विभागाने  पालीकेला ४५ दिवसाने पिण्याचे आवर्तन का सोडू नये. वर्षातुन केवळ चारवेळा पाणी पुरवठा करणाऱ्या पाटबंधारे विभागाला कोणीच जाब का विचारत नाही.

धरणात साठवलेले पाणी नागरीकांना गरजेनुसार वेळेत देण्या ऐवजी धरणात साठवून ठेवत अखेर पावसाळ्यात जायकवाडी धरणात पाणी सोडून दिले जाते पण नागरीकांना पिण्यासाठी मुबलक पाणी दिले जात नाही.  कोणाचे बरोबर आहे कोणाचे चुकीचे आहे, कोण राजकारण करते, कोण प्रामाणिक प्रयत्न करते या पेक्षा वर्षानुवर्षे कोपरगावकरांना भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावे लागते हे माञ नक्की.