शेवगावात एक दिवस घरकुलासाठी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : बेघरांना घरकुल देणाऱ्या विविध योजना राबविल्या जातात. त्यातील अनेक घरकुले अपूर्ण अवस्थेत राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने अपूर्ण घरकुले लवकर पूर्ण व्हावीत म्हणून, ‘सर्वांसाठी घरे २०२४ ‘हे धोरण शासनाने घेतले. या धोरणांतर्गत केंद्र पुरस्कृत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात २० नोव्हेंबर २२ ते ३१ मार्च २३ या कालावधीत ‘महा आवास ग्रामीण’ हे अभियान राबविण्यात येत आहे.

      या अभियानान्तर्गत पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना याशिवाय इंदिरा आवास  योजने मधील जी घरकुले अपूर्ण आहेत, अशा संबंधित लाभार्थ्यांची भेट घेऊन, प्रत्यक्ष घरकुलाची पाहणी करायची असून  ३१ मार्च २३चे आत सर्व घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करावयाचे आहे.

      शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी पंचायत समितीच्या सर्व सहकाऱ्यासह ‘आवास दिवस एक दिवस घरकुलासाठी ‘उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी पंचायत समिती मधील संपूर्ण स्टाफ हा अपूर्ण घरकुल पाहणीच्या मोहिमेवर जाणार आहे.

शेवगाव तालुक्यात ९४ ग्रामपंचायती असून सन २०१६-१७  पासून विविध योजनेतील एकूण ३ हजार ५०४ घरकुले अपूर्ण अवस्थेत आहेत. पंचायत समितीतील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी मिळून ७५ जण उद्या बुधवारी या लाभार्थ्यांच्या अपूर्णा अवस्थेतील घरकुलांची पाहणी करून ती जास्तीत जास्त लवकर पूर्ण कशी होतील यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत.

     ही घरकुले आता निर्धारित वेळेत कोणत्याही स्थितीत पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा  घरकुल अपूर्ण ठेवणाऱ्या लाभार्थ्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते व लोक अदालतीमध्ये त्यांचे विरुद्ध दावे दाखल होऊ शकतात. अशी वेळ येऊ नये असे आवाहन गट विकास अधिकारी डोके यांनी केले आहे.

‘आवास दिवस =एक दिवस घरकुलासाठी ‘ या उपक्रमासाठी  बुधवार दिनांक २८ रोजी  पंचायत समितीमधील चतुर्थ वर्गातील शिपाई वगळता एकूण एक कर्मचारी गृह भेटीसाठी जाणार आहेत. यात स्वतः गटविकास अधिकारी डोके, सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गाठ यांचे सह सर्व विभाग प्रमुख देखील या उपक्रमात सहभागी असून दस्तूर खुद्द स्वतः डोके अमरापूरमधील ७१ तर गाठ खामगाव व भातकुडगाव येथील १५९ अपूर्ण घरकुलांची पाहणी करुन संबंधित लाभार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेऊन घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत.