गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय मागे – कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : शासकीय गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला सरकारने स्थगिती द्यावी, यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे न हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असून, सरकारच्या या निर्णयामुळे गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत महसूल विभागाने नोटिसा बजावलेल्या कोपरगाव तालुक्यातील नऊशे कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. 

             गायरान जमिनीवरील गरीब लोकांनी बांधलेली घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंगळवारी (२९ नोव्हेंबर) स्पष्ट केले आहे. 

              उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. कोपरगाव तालुक्यातील १७ गावांतील सुमारे ९०३ नागरिकांना गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढून घेण्याच्या नोटिसा महसूल विभागाने बजावल्या होत्या.

                 वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर कोपरगाव तर शिर्डी येथील मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांची समस्या मांडली होती. 

        या अतिक्रमणधारकांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाईल, असे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या निर्णयाबद्दल शिंदे फडणवीस शासनाचे बिपीन कोल्हे, स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी आभार मानले आहेत.