रेणुका माता देवस्थानात भाविकांची गर्दी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त श्री क्षेत्र अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात भाविकांनी काल पाचव्या माळेला गर्दीचा उच्चांक केला. रोज पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत राज्याच्या विविध भागातून मोहटा देवीला पायी व विविध वाहनातून येणारे असंख्य भाविक अमरापूरच्या देवस्थानातही रेणुका आईसाहेबांच्या दर्शनाला येत आहेत.

रेणुकामाता देवस्थानात रोज सप्तशती पाठ होत असून वेदशास्त्र संपन्न सच्चिदानंद देवा, तुषार देवा यांच्यासह ११ ब्रह्म वृंद विधीवत पूजा अर्चा करत आहेत. श्रीं कुंकुमार्चन, हरिद्वार्चन, ऐलार्चन ,पुष्पार्चन, बिल्वार्चन नियमितपणे होत असून गुरुवारी पाचव्या माळेला रेणुका भक्ताअनुरागी कै. चंद्रकांत भालेराव यांचे पुण्यस्मरणा निमित्त देवस्थानात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अॅड नितीन भालेराव यांनी स्व. दादांची पुजा बांधल. रेणुका आईसाहेबांच्या गाभाऱ्यात हजारो फळांची आकर्षक रास घालण्यात आली होती.

शुक्रवारी गुलाब पुष्पांची आकर्षक आरस करण्यात आली. ही पूजा रेणुका भक्तानुरागी डॉ. प्रशांत नाना व जयंती भालेराव या पती-पत्नीने बांधली. या देवस्थानाचा संपूर्ण परिसर हजारो वृक्षवेलींनी नटल्याने त्याला अत्यंत रमणीनिय अशा पर्यटन स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणचे अनेक भाविक, सायकल क्लब, पंचक्रोशीतील शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी सहलीने येथे येत असून आईसाहेबांच्या दर्शनाच्या लाभाबरोबरच पर्यटनाचा आनंद लुटीत आहेत. पाथर्डी तालुक्यातील काळेगाव, सुसरे, चितळी, पाडळी तर शेवगाव मधील वडुले, फलकेवाडी, आव्हाने येथील प्राथमिक शाळातील बालगोपालांच्या अनेक पायी दिंड्या आल्या.

आरतीला उपस्थिती लावून दर्शन घेतले. परिसरातील वृक्षवेलीच्या ढालीत बसून आपापल्या शिक्षक वृंदा बरोबर फराळ केला. या शाळांच्या सहली विविध रंगी ड्रेस कोड मध्ये आल्याने येथील गर्द हिरवाईत विलोभनीय दृश्य भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. याशिवाय गावोगावच्या महिला भजनी मंडळानी येथे हजेरी लावून आईसाहेबांच्या चरणी भजन सेवा रुजू केली. त्यात पाथर्डीच्या साईनाथ महिला मंडळ, अंबिका भजनी मंडळ व नगर येथील दूर्गा महिला मंडळाने श्रोत्यांची दाद मिळवली.