हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी अधिकचा निधी मिळविण्यास प्रयत्नशील – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांना कोपरगाव शहरातील नागरिकांप्रमाणे सर्व प्रकारच्या मुलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी अधिकचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच द्वारकानगरी व शंकरनगरला जोडणाऱ्या पुलाच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी करून लवकरात लवकर काम गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या.

हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासून कोपरगाव शहरातील नागरिकांप्रमाणे हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांना देखील सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हद्दवाढ झालेल्या भागातील विविध विकास कामांसाठी १० कोटीचा निधी मिळविण्यात त्यांना यश मिळाले आहे.

या दहा कोटीच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून रस्ते, ड्रेनेज, आदी कामे मार्गी लागणार आहेत. हद्दवाढ झालेल्या या भागाचा अत्यंत महत्वाचा पुलाचा प्रश्न सोडविण्यासाठी निधी देवून हा प्रश्न यापूर्वीच मार्गी लावला आहे. यापुढील काळातही कोपरगाव शहराचा ज्याप्रमाणे विकास झाला त्याप्रमाणेच हद्दवाढ झालेल्या भागाचा देखील सर्वांगीण विकास होवून नागरिकांना सर्व मुलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, बाळासाहेब रुईकर, मुकुंद इंगळे, संदीप कपिले, शैलेश साबळे, सचिन गवारे, शुभम लकारे, सागर लकारे, रिंकेश खडांगळे आदी उपस्थित होते.