गायरान जामिनीवर अतिक्रमण, सरपंचाचे सरपंच पद रद्द

औरंगाबाद खंडपिठाचा आदेश

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : तब्बल चार वर्ष पाठपुरावा करत एका युवकास अखेर औरंगाबाद खंडपीठात न्याय मिळाला. गावच्या सरपंचाने शासनाच्या गायरान क्षेत्रावर अतिक्रमण केले असल्याने, त्यांना अपत्र ठरवावे म्हणून सप्टेंबर २०१८ ला सुरू केलेल्या लढाईचा पिच्छा त्याने गेल्या आठवड्यापर्यंत पुरवला. या लढाईच्या दरम्यान जिल्हाधिकारी तसेच नाशिकच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी त्यांची तक्रार फेटाळली होती. तरीही त्याने हार मानली नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्याने आपली कैफियत मांडली आणि नुकतेच १९ जुलै २३ ला खंडपीठाने त्यास न्याय दिला. आता सप्टेंबर मध्ये या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. अवघ्या दोन महिन्यासाठी का होईना, सरपंच पद रद्द केल्याचे समाधान त्या युवकास अधिक आहे. राजकारण हा नादच खुळा, एकदा रिसीला लागला की, नाद करायचा नाही. हेच खरे !

तालुक्यातील  जायकवाडीच्या किनारपट्टीवर वसलेले लाखेफळ हे छोटेसे गाव या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक २६ सप्टेंबर २०१८ ला झाली. त्यात सविता शरद सोनवणे, या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रिया हनुमंत बेळगे, या अवघ्या ९ मतांनी पराजीत झाल्या. निवडणूक संपली पण तेढ कायम राहिली. त्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्याची हेळसांड होऊ लागली. त्याने दुखावलेल्या प्रिया यांचे पति हनुमंत बेळगे या युवकाने सरपंच सविता सोनवणे, यांनी शासकीय गायरानावर अतिक्रमण केले असल्याने, त्यांचे सरपंच पद रद्द करावे म्हणून, जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार केली.

मात्र जिल्हाधिकारी यांनी येथील गायरान जमिनीवर या गावच्या अनेकांचे वास्तव्य असल्याने, त्यांनी ती फेटाळली. त्यावर बेळगे यांनी नाशिकला विभागीय आयुक्तांकडे अपील केले. मात्र तिथेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्याचा निकाल कायम ठेवला. त्यावर बेळगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. रवी गीते यांचे मार्फत याचिका दाखल केली. 

न्यायमूर्ती किशोर संत यांचे पुढे सुनावणी झाली असता, न्यायमूर्तींनी महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत अतिक्रमण कायदा  १४ ( १ ) ( J ३ ) च्या अंतर्गत याचिका मंजूर करून सरपंच सविता सोनवणे यांनी शासकीय गायरानावर अतिक्रमण केल्याचे मान्य करून त्यांचे पद अपात्र ठरविण्याचा आदेश पारित केला आहे. आज न्यायालयाच्या आदेशाच्या प्रति हनुमंत बेळगे व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी, तहसिलदार यांना लढाई जिंकल्याच्या जोशात समक्ष दिल्या.