हुशारी, कष्टापेक्षा प्रामाणिपणा महत्वाचा – माजी मंत्री राजेश टोपे

 संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २९ : मनुष्याला यशस्वी होण्यासाठी त्याच्यातील हुशारी, कष्ट करण्याची तयारी आणि स्वभावात प्रामाणिकपणा असे तीन गुण महत्वाचे असतात. पहिले दोन गुण आहेत आणि तिसरा गुण प्रामाणिपणाच नाही तर पहिल्या दोन गुणांची किंमत शुन्य होते. म्हणुन शालेय जीवनात विध्यार्थ्यांमध्ये प्रामाणिपणाचे रसायन भरले तर भविष्यात  कोणतही वादळ-वारं त्यांना विचलीत करणार नाही. यासाठी संस्कारक्षम पिढी घडविणे, हे शिक्षणाचे मुख्य ध्येय असावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र  राज्याचे माजी सार्वजनिक आरेग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित शिर्डी  येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसम्मेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात  प्रमुख पाहुणे म्हणुन टोपे बोलत होते. यावेळी कोपरगांवच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे, कलावती कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, प्राचार्या सुधा सुब्रमण्यम उपस्थित होते. पालक आणि विध्यार्थ्यांचे नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी सुब्रमण्यम यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर टोपे यांचे हस्ते विविध क्षेत्रात विध्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबध्दल पारितोषिके देवुन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. मनाली कोल्हे यांनी राज्य व देश पातळीवर विध्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात अनेक पदकांची कमाई केल्याचे सांगीतले. तसेच विध्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना आधुनिक ज्ञान देण्यासाठी तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली  मिनी एमबीए, यंग सॉफ्टवेअर, रोबाटिक्स, कोडींग आणि फॅशन डीझाईनचे अभ्यासक्रम विनामुल्य शिकविले जाणार असल्याचे जाहिर केले.

टोपे पुढे म्हणाले की, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहीजे यासाठी अनेक शिक्षण  संस्था काढुन मोठे कार्य केले. त्यांनी हाती घेतलेले कार्य कोल्हे कुटूंबिय नेटाने पुढे नेत आहे. येथिल विध्यार्थ्यांनी सादर केलेले कला अविष्कार , येथिल विध्यार्थ्यांसाठीच्या आधुनिक सोयी सुविधा या सर्व विध्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या साक्ष देतात.

पालकांनी आपले स्वप्न मुलांवर लादु नये तर त्यांची आवड ओळखुन त्यांना विकसीत करावे. पालकांनी सुध्दा पाल्याकडून फक्त शैक्षणिक गुणवत्तेची अपेक्षा न करता खेळासह इतर क्षेत्रातही त्यांचा सहभाग नोंदविण्यासाठी प्रवृत्त करावे. खेळाला येथे महत्व दिल्या जात आहे, हे विध्यार्थ्यांच्या दृष्टीने जमेची बाजु आहे कारण सुदृढ शरीरात खंबीर/सृदृढ मन असते. ‘वाचाल तर वाचाल’ असे सांगुन विध्यार्थ्यांनी नेहमी आवांतर वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी, असे ते शेवटी म्हणाले.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, संजीवनी शैक्षणिक  समुहाने उत्तम शैक्षणिक दर्जा राखल्याने आज संजीवनीचे माजी विध्यार्थी संपुर्ण जगात मोठ्या पदांवर कार्यरत आहे. टोपे यांनी कोविड काळात उत्कृष्ट परीस्थिती हाताळली, याबध्दल त्यांनी त्यांच्याबध्दल गौरवोद्गार काढले.