कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले. ही अतिशय दुख:द बातमी आहे. खा.गिरीश बापट यांच्या निधनामुळे भाजपची खूप मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून, आपण एक आदर्श लोकप्रतिनिधी, प्रामाणिक आणि निष्ठावंत नेता गमावला आहे, अशा शब्दांत भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी खा. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, खा.गिरीश बापट साहेब यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. गिरीश बापट आज आपल्यामध्ये राहिले नाहीत यावर विश्वासच बसत नाही. ते अत्यंत झुंजार असे व्यक्तिमत्त्व होते. गेल्या दीड वर्षांपासून ते एखाद्या झुंजार योद्ध्याप्रमाणे आजाराशी झुंज देत होते. पक्षावर त्यांची अजोड निष्ठा होती. दुर्धर आजाराशी झुंजत असतानादेखील गिरीश बापट साहेब हे भारतीय जनता पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. शेवटच्या क्षणापर्यंत ते पक्षासाठी कार्य करत होते. आजारातून ते बरे होऊन सार्वजनिक जीवनात पुन्हा सक्रिय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता; पण तो विश्वास नियतीने खोटा ठरवला आहे.
खा. गिरीश बापट साहेब यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि मला मोठा धक्काच बसला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मी २०१४ ते २०१९ या कालावधीत भाजप आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करत असताना गिरीश बापट साहेब हे मंत्री होते. त्या काळात कोपरगाव मतदारसंघातील वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने सातत्याने गिरीश बापट यांच्याशी संबंध आला. मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे खूप सहकार्य लाभले.
सन २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गिरीश बापट साहेब यांनी अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य विभागांचे मंत्री म्हणून काम करताना महाराष्ट्राच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले. ते अतिशय शिस्तप्रिय होते. ते संसदीय कार्यमंत्री असताना सभागृहात आमदारांनी शिस्तीने कसे वागावे याचे धडे ते आम्हाला द्यायचे. आमचे बौद्धिक घ्यायचे. सर्व आमदारांना सभागृहाचे नियम समजावून सांगायचे. त्यांचे वागणे अतिशय साधे होते.
ते मला मुलीसमान मानत असत. त्यांनी एकदा माझ्या घरचा डबा खूप आवडीने खाल्ला होता व डबा खाल्ल्यानंतर मला खूप चांगला स्वयंपाक येतो, अशा शब्दांत त्यांनी माझे कौतुक केले होते. त्यांनी मला स्वत:च्या हाताने मला ओली भेळ खायला दिली होती. अशा गिरीश बापट साहेबांसोबतच्या माझ्या अनेक आठवणी आहेत.
एकीकडे प्रेमळ स्वभाव तर दुसरीकडे सभागृहात काम करताना कडक शिस्त असे त्यांचे वागणे होते. गिरीश बापट साहेबांनी मंत्री म्हणून काम करताना कधीही बडेजावपणा केला नाही. त्यांना कसलाही अहंकार नव्हता. अत्यंत अभ्यासू, सुसंस्कृत, साधे-सरळ असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
पुण्याच्या विकासात आणि भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये त्यांचे खूप मोठे योगदान होते; महापालिका, विधानसभा आणि लोकसभेत त्यांनी केलेले काम अत्यंत उल्लेखनीय आहे. बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरके झाले आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला आहे, अशी भावना स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
खा. गिरीश बापट यांनी कारकीर्दीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक, जनसंघाचे कार्यकर्ते, कामगार नेता, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायमच पुढाकार घेतला. गिरीश बापट साहेबांनी १९९५ मध्ये पहिल्यांदा पुण्यातून आमदारकीची निवडणूक लढविली अन् पुढे २०१४ पर्यंत ते सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य आणि विकासाचे राजकारण केले.
टेल्को कंपनीतील कामगार नेत्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहोचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत बापट साहेबांना पुणेकरांचे अलोट प्रेम मिळाले. विरोधी पक्षांना सोबत घेऊन कसे काम करायचे, एखादी समस्या कशी सोडवायची यामध्ये त्यांचे कौशल्य होते. अत्यंत मनमिळाऊ आणि लोकप्रिय नेता असे त्यांचे वर्णन करावे लागेल. बापटसाहेबांच्या निधनामुळे भाजपचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, असे सांगून स्नेहलताताई कोल्हे यांनी भारतीय जनता पक्ष कोपरगाव विधानसभा मतदारसंघ व संजीवनी उद्योग समूहाच्या आणि कोल्हे परिवाराच्या वतीने खा. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.