शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासले पण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे काम तालुक्यात सुरु झाले असून ते ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यासाठी येथील त्रिमुर्ती पब्लिक स्कूल मध्ये तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी विस्तार अधिकारी सचिन भाकरे, सुरेश मुरकुटे, राहुल नजन, रवींद्र टाक यांचेसह ६३१ प्रगणक व ४४ प्रवेक्षक सहभागी झाले होते. गटविकास अधिकारी राजेश कदम, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन राऊत, नायब तहसीलदार राहुल गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून संगणक समन्वयक सुरेश बर्डे हे संगणकीय काम पाहत आहेत. या सर्वेक्षणास प्रत्यक्ष सुरुवात झाली असून माहितीस्थव तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या सर्वेक्षण प्रश्नावलीत तब्बल १८४ प्रश्न आहेत.