कोपरगांव प्रतिनिधी, दि. १३ : गोर गरीब वंचित तसेच अबाल वृध्दांना तालुक्याच्या ठिकाणी जाउन उपचार घेणे अडचणीचे ठरते त्यासाठी वाड्या- वस्त्या, तांडे, गांव खेडयातच वैद्यकिय उपचारांची सेवा देण्यांत शंकरराव कोल्हे आर्युवेद महाविद्यालय कटीबध्द असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष साहेबराव कदम यांनी केले.
तालुक्यातील रवंदे येथे संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा व रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे फिरत्या वैद्यकिय उपचार रूग्णवाहिका सेवा शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते त्याचे उदघाटन करतांना ते अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव लामखडे यांनी प्रास्तविक केले.
कदम पुढे म्हणाले की, कोपरगांव विधानसभा मतदार संघात शेती. सहकार, शिक्षण, समाजकारण, सांस्कृतिक आदि असंख्य क्षेत्रात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे अभाळाएव्हढे काम आहे. वैद्यकिय क्षेत्रातही ग्रामिण भागातील मुला मुलींना शिक्षणाच्या संधी प्राप्त व्हाव्या यासाठी आर्युवेद महाविद्यालयाची स्थापना केली.
आज ग्रामिण भागातील गोर गरीब, अबाल वृध्द आजारी पडले तर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाउन उपचार घेणे शक्य होत नाही त्यासाठी त्यांच्या दारातच फिरत्या वैद्यकिय दवाखान्याची संकल्पना साकारण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयूटचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी विशेष प्रयत्न केले.
संजीवनी युवाप्रतिष्ठानचे अध्यक्ष व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी वंचितांच्या दारी आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे. कोरोना आपत्तीत त्यांनी चांगल्याप्रकारे नियोजन करून संजीवनी कोवीड डेडीकेटेड अंतर्गत मोफत वैद्यकिय सेवा देवुन त्याबाबतचे मार्गदर्शन एकाच छताखाली दिले ही उपलब्धी मोठी आहे.
याप्रसंगी उपसरपंच संदिप कदम, केशवराव कंक्राळे, भिमराव भुसे, आबासाहेब खोंड, शंकरराव काळे, संजय काळे, आण्णासाहेब घायतडकर, मच्छिंद्र लामखडे, अरूण सोनवणे, प्रविण कदम, आदि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. डॉ. सुजित सोनवणे यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वितरण केले.