शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : शेवगाव तालुक्यात सार्वजनिक श्रावणी पोळा साजरा करण्याची दीर्घ कालिन परंपरा असून येथील शेतकर्यांच्या घरात दिवाळ सणापेक्षाही बैल पोळ्याची मोठी धामधूम असते. सन १९१२ पासून येथे सार्वजनिक पोळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. पोळ्यासाठी शेवगावच्या मध्यवर्ती ठिकाणी बैल पोळ्यासाठी शासकीय राखीव जागा आहे. मात्र चालू वर्षी पावसाची अवकृपा झाल्याने पोळ्यावर दुष्काळाचे सावट आहे.
एरव्ही १५ -२० दिवस अगोदर बैल पोळ्याची धामधूम असे. मात्र गेल्या दोन तिन दिवसात परिसरात पावसाची तुरळक झीमझीम झाल्याने शेतकरी आपल्या सर्जा राज्याचे कौतुकासाठी सरसावला आहे. खरीप हंगाम अडचणीत सापडला असला तरी रब्बी हंगाम साधला जाईल या आशेने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मोलाची साथ देणाऱ्या पशुधनाचा बैलपोळा हा महत्त्वाचा सण साध्या प्रमाणात का होईना साजरा करण्याच्या मनसुब्यातून शेतकऱ्यांनी आज बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. बैलपोळ्याच्या पशुधनासाठी आवश्यक हिंगुळ, पितळी तोडा, घोगर माळ, शेंबी, शिंग दोरी, वेसन , कासरा रेशीम सुत दोरी, वायर मोहरकी, मणी माळ, बाशिग, झुल या साहित्याचे भाव गेल्या वर्षी प्रमाणेच आहेत.
मात्र नारळ, हरभरा, डाळ, गुळ आदी किराणा मालाच्या किमती मात्र आकाशाला भिडल्या आहेत. तरी शेतकऱ्यांनी गरजेपुरती आवश्यक खरेदी करून बैलपोळ्याची तयारी केली आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्या कडील पशुधन मोठ्या प्रमाणात घटले आहे, त्यातच यंदाचे पावसाचे अस्मानी संकटाचा परिणाम बैलपोळा सणावर झाला असल्याच्या प्रतिक्रिया येथे प्रत्येक जण व्यक्त करत आहेत.