११ डिसेंबर पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू
शेवगाव प्रतिनिधी, दि.१२ : तालुक्यातील चेडे चांदगाव येथील शेतकर्यांच्या गट नंबर २८ मधून सुमारे तीन महिन्यापूर्वी खोटे दस्ताऐवज करून व बेकायदेशीर रित्या उत्खनन करून मोठ्या प्रमाणात चोरीला गेलेला मुरूम ज्येष्ठ ठेकेदार व भाजपाचे पदाधिकारी अरुण मुंडे व त्यांचे बंधू उदय मुंडे यांनी परिसरातील चापडगाव ते हदगाव रस्त्याच्या कामासाठी नेला असल्याचा थेट आरोप करून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
राजकीय पदाचा गैरफायदा घेऊन आर्थिक लाभासाठी शासनाची फसवणूक करून आमच्या शेतीचे नुकसान केले. अनधिकृतरित्या मुरुमाचे उत्खनन करून गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला असतांना याबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. म्हणून चंद्रकांत चेडे यांच्यासह शिवाजी रंगनाथ चेडे, श्रीराम रंगनाथ चेडे, प्रभाकर रामभाऊ चेडे, परमेश्वर भगवान चेडे, आत्माराम रंगनाथ चेडे यांनी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवार दि.११ डिसेंबर पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू असून, उपोषणाचा आज दूसरा दिवस आहे.
आपल्या तक्रारीची सविस्तर चौकशी करून दोशी विरुद्ध प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या कारवाईचे पत्र मिळेपर्यंत उपोषण आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करून, मुंडे यांनी कट रचून महसूल प्रशासन व शासन यांची परवानगी न घेता, तसेच शेतमालकांना न विचारता, आपली वाहने शेतामध्ये घालून शेती पंपाचे नुकसान केले आहे.
जोड जमाव करून मुंडे कॉन्ट्रॅक्टरचे मालकीचे वाहनाद्वारे पाच सप्टेंबरला सकाळी सातच्या सुमारास मुरूम चोरीचे काम करताना चालक-मालक व त्यांचे साथीदारांना विरोध केला. तेव्हा त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी देवून ही जमीन नाही गायरान आहे. असे म्हणून शिवीगाळ केली. तशी लेखी तक्रार त्याच दिवशी मी तहसीलदारांकडे केली होती.
त्यानंतर १८ सप्टेंबरला पुन्हा तक्रार दिली. त्यावर तलाठी मंगेश कदम यांनी अंदाजे फक्त २० ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचा पंचनामा केला. याबाबत २१ सप्टेंबरला शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असता. १७ ऑक्टोबरला सार्वजनिक बांधकाम विभागाने पंचनामा केला. तेव्हा त्यांनी आठ खड्ड्याचे मोजमाप करून गट नंबर २८ मधून ४०.६९ ब्रास मुरमाचे उत्खनन झाल्याचा अहवाल दिला. तरी सुद्धा आज अखेर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे एकदाचा निकाल लागेपर्यंत बेमुदत उपोषण सुरु केले आहे. असे तक्रार अर्जात म्हटले आहे.
दरम्यान सोमवारी पहिल्या दिवशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळो, तालुकाध्यक्ष नंदकुमार मुंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, संचालक हनुमान पातकळ, मनोज तिवारी, अशोक तानवडे आदिंनी आंदोलकांची भेट घेऊन पाठींबा दिला. निवेदनाच्या प्रती केंद्रिय गृह मत्री, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्य मंत्री, राज्य गृहमंत्री, महसूल आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी, मोलिस कमिशनर, जिल्हा पोलिस प्रमुख आदिंना पाठविण्यात आले आहेत.