कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : राज्य सरकारने दुधाची दरवाढ करणे व केंद्र सरकारने कांदा निर्याती वरील बंदी हटवणे या मागणी करता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली १५ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हार येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोपरगाव तालुका व शहर शिवसेनेचे शिवसैनिक देखील सक्रिय सहभागी असणार आहे. तेव्हा राज्य सरकारने तातडीने दुधाचे दर वाढवावे तसेच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवावी अशी मागणी करत. कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना लेखी स्वरुपात निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना उत्तर नगर जिल्हा सह संपर्कप्रमुख राजाभाऊ झावरे, जिल्हा समन्वयक नितीन औताडे, उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, शहर उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, तालुकाप्रमुख बाळासाहेब रहाणे, शहर प्रमुख सनी वाघ, युवासेना संपर्कप्रमुख भैया तिवारी, शहर संघटक कलींदर दडीयाल, शहर समन्वयक कालुआप्पा आव्हाड, सरपंच संजय गुरसळ, उपसरपंच शिवाजी जाधव, अभिषेक आव्हाड, मनोज कपोते, मनोज विसपुते, बालाजी गोर्डे, अमोल शेलार, सिद्धार्थ शेळके, गणेश जाधव, रवी कथले, नितीश बोरुडे, प्रीतम काटकर, शेखर बोरावके आदी उपस्थित होते.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने दुधाचे दर कमी केल्यामुळे राज्यातील दूध उत्पादक अडचणीत आलेले आहेत. चाऱ्यासाठी लागणारा खर्च खाद्याच्या वाढलेल्या किंमती जनावरांना संगोपनासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा हिशोब केल्यास आजचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नसून दूध उत्पादक प्रचंड अडचणीत आलेले आहेत. तसेच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्यामुळे कांद्याचे भाव गडगडलेले आहेत. कांदा उत्पादनासाठी येणारा खर्च देखील भेटत नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. तरी राज्य सरकारने दुधाचे दर प्रतिलिटर दहा रुपये वाढवून देणे व केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी त्वरित हटवणे.
याकरता जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली 15 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हार येथे शिवसेना पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनात करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम होणार आहे. त्यामुळे सरकारने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा व मागण्या मान्य कराव्या या आशयाचे कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना निवेदन देण्यात आले.