सुशांत घोडके यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार – २०१९ कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थापक आणि वृक्ष पर्यावरण प्रेमी, भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना जाहीर झाला आहे. यात राज्यस्तरीय व्यक्तींमध्ये दूसरा तर नाशिक विभागाचा प्रथम अशा दोन पुरस्कारांचा समावेश आहे.

         महाराष्ट्र शासन वन विभागाने वृक्षारोपण आणि पर्यावरण क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांची यादी जाहीर केली आहे. राज्यात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. शिर्डी उपविभागासह कोपरगाव तालुक्यात स्वच्छतादूत आणि पर्यावरण प्रेमी म्हणून सुशांत घोडके यांचे कार्य अनेक वर्षांपासून सर्वांना परिचित आहे.

हरित सेनेच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि संवर्धन माध्यमातून सुशांत घोडके यांनी कोपरगावसह खेड्यापाड्यात रुजवलेली वृक्षारोपण चळवळ, विविध पक्षी, प्राणी यांना दिलेले जीवदान, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केलेली जनजागृती केली आहे.पक्षी व पर्यावरणास हानीकारक नायलाॅन धाग्यावर प्रखर जनजागृती त्यांनी केली आहे. कडूलिंबाचे महत्व जाणून ३३ हजार पेक्षा जास्त रोपांचे वितरण, रोपण आणि पालकत्व दिले आहे. या शिवाय लोकसहभागातून शाळा व सार्वजनिक ठिकाणी  फुल झाडांची उद्यान विकसित केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने दिलेला वनश्री पुरस्कार हा माझे सोबत काम करणाऱ्या प्रत्येक वृक्ष व पर्यावरण प्रेमींचा हा सन्मान आहे.माझ्या अनेक सार्वजनिक कार्यात साथ देणारे आई- वडील, कुटुंबिय,वृक्ष मित्र,ज्ञात – अज्ञात घटक, पर्यावरण प्रेमी नागरिक, शिर्डी उपविभागासह कोपरगांव तालुका वासियांना हा पुरस्कार समर्पित आहे  – सुशांत घोडके, महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार – २०१९. 

शाळा, महाविद्यालय, वसतीगृह यासह सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून संवर्धनाचे कार्य उल्लेखनीय आहे. पक्षी आणि वन्यजीव संरक्षणासाठी त्यांची नेहमी धडपड असते. पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांची वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. अनेकांचे ते प्रेरणास्रोत आहे ‌त्यांना समाजरत्न, नाट्यमंदार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

            छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्यस्तरीय व्दितीय व विभागीय प्रथम एकाच वेळी घोषित झालेले पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके हे अहमदनगर जिल्ह्यातील पहिले व्यक्ती ठरले आहे. शिर्डी उपविभागात त्यांचे पर्यावरणावर उल्लेखनीय कार्य आहे.