गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास स्थगिती – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत महसूल विभागाकडून गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे सर्व प्रचंड कुटुंब दडपणाखाली होते. त्याची दखल घेवून या कुटुंबांना दिलासा मिळावा यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पाठपुरावा केला होता.

त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महसूल विभागाच्या नोटिसींना स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळाला असून त्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

गायरान जमिनीवर असलेली अतिक्रमणे काढण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महसूल विभागाच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या होत्या. कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सरकारी गायरानावर वास्तव्यास असलेल्या अनेक कुटुंबांना त्याचा फटका बसून त्यांचे संसार उध्वस्त होणार होते.

मागील अनेक वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांची संख्या जवळपास ९०० एवढी होती. हि सर्व कुटुंब आर्थिक दृष्ट्या दुर्बल असून त्यांना राहण्यासाठी स्वत:च्या मालकीची जागा नसून या कुटुंबांमध्ये सर्व कुटुंब कष्टकरी, भूमिहीन गोर-गरीब, हातावर पोट भरणारे आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही झाल्यास मागील अनेक वर्षापासून गायरानावर वास्तव्यास असणाऱ्या भूमिहीन गोर-गरीब, हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी अशा अनेक कुटुंबांचे संसार उद्वस्त होवून हि कुटुंबे रस्त्यावर येणार होती.

तसेच सरकारी गायरान जमिनीवर शासनाच्या लेखी परवानगीने ग्रामपंचायत कार्यालय, पाणी पुरवठा योजना, शाळा इमारती, स्मशानभूमी आदी उभारण्यात आल्या असून हे अतिक्रमण देखील काढण्यात येवून त्यामुळे शासनाच्या खर्च झालेला निधी वाया जाणार होता. याबाबत आ. आशुतोष काळे यांनी मुद्देसूद मांडणी करून त्याबाबत त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.

त्या पाठपुराव्याला यश मिळून महसूल विभागाच्या नोटिसींना स्थगिती देण्याच्या आदेशाचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील ९०० कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांच्या बाबतीत शासन पुढेही सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केली आहे.