प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी योग शिबीर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०७ : धावपळीच्या जीवनात कुटुंबाची सर्वोतोपरी काळजी घेणारी महिला आपल्या आरोग्याच्या बाबतीत मात्र, सहसा फारशी गंभीर नसते. त्यामुळे अनेक व्याधींचा सामना महिला भगिनींना करावा लागतो. अशा व्याधींना दूर ठेवण्यासाठी नियमित योग साधना उत्तम पर्याय असून महिला भगिनींना योग साधनेचे प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या पुढाकारातून सोमवार (दि.०९) पासून कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे महिलांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी दिली आहे.

प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे व जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांच्याकडून नेहमीच महिलांसाठी विविध उपक्रम राबवीले जातात. गोदाकाठ महोत्सव, नवरात्र महोत्सव, महिलांना विविध घरगुती व्यवसायाचे प्रशिक्षण असे अनेक उपक्रम राबवून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करीत असून यावर्षी नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 योग साधना ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. योगामुळे अनेक व्याधी दूर होत असल्याचे शास्त्राने सिद्ध केले आहे. नियमित योगासने केल्याने मन प्रसन्न व उत्साही राहते. शरीर व मनाची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त वजन कमी होते. वजन कमी असल्यास वाढण्यासदेखील मदत होते. त्याचप्रमाणे शरीर व मनावर नियंत्रण करणे शक्य होते. नियमित योगामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. 

याचा फायदा महिला भगिनींना होवून त्यांना देखील नियमित योग साधना करण्याची सवय होऊन त्यांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याचे प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे व जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी सांगितले आहे. या योग शिबिरात योग प्रशिक्षक डॉ. अभिजित शहा,  वैभवी मखीजा योग साधनेचे धडे देणार असून या योग शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे व जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी केले आहे.