रामनवमी उत्सव हजारो तरुणाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा

शेवगाव प्रतिनिधी, दि.२२ : शेवगाव शहर व तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी रामनवमी उत्सव हजारो तरुणाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शेवगावचा पारा ४१ च्यावर गेल्याने सायंकाळी साडेसहा नंतर येथील संत गाडगे बाबा चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी श्री प्रभू रामचंद्राचा मोठे पोट्रेट असलेला रथ, त्यामागे ट्रॅक्टरच्या स्टेजवर महाकाय हनुमान आणि त्याच्या मागे भगवा टी शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेले हजारो तरुण ‘भारत का बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा’ आदि गाण्यावर व डीजे च्या तालावर ठेका धरून  बेधूंद होऊन हजारो तरुणांचा ताफा नाचत होता.

शेकडो तरुण भगवे ध्वज हवेत फिरवत होते. साथीला फटाके तोफाची आतशबाजी करत मिरवणूक मुंगीच्या गतीने क्रान्ती चौकाकडे कूच करत होती.
पोलिस प्रशासनाने मात्र, हा उत्सव कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गांभिर्याने घेतला. अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे यांचे नेतृत्वा खाली विभागीय पोलिस उपअधिक्षक सुनिल पाटील, पोलीस निरीक्षक अंबादास भदाणे यांचे सह दिवसभर शेवगावात प्रचंड पोलिस बंदोबस्त होता.

पाथर्डी, नेवासे येथील पोलिस, सी आय डी विभागाचे तसेच दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात आली होती. या उत्सवासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार असे सांगितले जात होते. त्यामुळे शेवगावात जाणारे बाजार पेठ, मोची गल्ली असे सर्व रस्ते बल्या व पत्रे ठोकून बंद करण्यात आले होते. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. एकही गिऱ्हाईक नसल्याने अनेकांनी आपली दुकाने बंद केली होती.