जलद चालण्याच्या स्पर्धेत ओंकार शेळके, ओमकार मार्गे राज्यात द्वितीय

शेवगाव प्रतिनिधी, दि.३१ : तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवरील जलद चालणे स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावले आहे. राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने दि. ३० ऑक्टोबर ते दि. ०२ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर ( विसापूर ), जिल्हा चंद्रपूर येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.

त्या स्पर्धेत बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ओमकार नवनाथ मार्गे यांने १९ वर्षे वयोगटात तर ओंकार म्हसुदेव शेळके याने १७ वर्षे वयोगटात ५ किलो मीटर जलद चालणे स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. या दोन्ही खेळाडूंची  राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

श्री भगवान विद्यालयाच्या या विद्यार्थ्यांनी सिल्व्हर मेडल मिळवत पुणे विभागाचे तसेच जिल्ह्याचे, विद्यालयाचे नाव उंचावले आहे. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक कल्याण मापारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे हरिभाऊ वाघुंबरे, म्हसुदेव शेळके, विजय लेंडाळ, पत्रकार इसाक शेख यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.