स्थानिक बाजारपेठेत खरेदी करा आणि जिंका हजारोंचे बक्षिस

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने स्थानिक बाजारपेठेला चालना मिळण्यासाठी कोपरगावातील नागरिकांनी कोपरगावातील दुकानदाराकडेच माल खरेदी करावा. यासाठी ‘स्थानिक खरेदी प्रोत्साहन’ योजना सुरू केली असल्याची माहिती कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कार्याध्यक्ष सुधीर डागा, अजित लोहाडे, तुलसीदास खुबाणी, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी दिली.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व. मोहनलाल झंवर सभागृहात प्रियदर्शनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पुष्पा काळे व अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्टचे प्रमुख पराग संधान यांच्या शुभ हस्ते ‘स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजने’ चा शुभारंभ करण्यात आला. योजने बाबत अधिक माहिती देताना व्यापारी महासंघाचे महासचिव प्रदीप साखरे म्हणाले की, विशिष्ट खरेदीवर ग्राहकांना आकर्षक बक्षिसांसाठी कुपन्स दुकानदारांना दिली जातील.

ही कुपन्स दुकानदारांनी आपल्या ग्राहकांना खरेदीच्या प्रमाणात मोफत द्यावयाची आहेत. ३० नोव्हेंबर पर्यंत ही योजना सुरू असून या दिवसात वितरित झालेल्या कुपन्स मधून ग्राहक निवडले जातील व त्यांना आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत. या योजने अंतर्गत लाखो रुपयांची शेकडो बक्षीस वितरित करण्यात येणार आहे.

दुकानदारांनी कुपन्ससाठी समता नागरी सहकारी पतसंस्थेत सतीश निळकंठ (९९६०१२१३८१) यांच्याशी संपर्क साधावा. या बक्षिसांसाठी मुख्य प्रायोजक शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष व विद्यमान आमदार आशुतोष काळे व सहप्रायोजक सहकार महर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे आहेत. या योजनेच्या माध्यमातून सर्व स्थानिक दुकानदारांकडून खरेदी करणाऱ्या ग्राहकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

दुकानदारांना आवाहन करताना व्यापारी महासंघाच्या धारणगाव रोड शाखेचे अध्यक्ष गुलशन होडे व ओंकारदास चुनीलाल सोनी फर्मचे महावीर सोनी म्हणाले की, व्यापाऱ्यांनी देखील आपल्या दुकानातून विकला जाणारा माल वाजवी दरात व गुणवत्तापूर्ण असावा, याची काळजी घेतली पाहिजे. तसेच ग्राहकांनी सुद्धा ऑनलाईन खरेदीच्या मोहाला बळी पडू नये. या खरेदीमध्ये फसवणूक होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते.

ऑनलाइन खरेदीमध्ये वस्तूवर एमआरपीपेक्षा अधिक किंमत लावून त्यावर अधिकाधिक डिस्काउंट दिला जातो. तसेच वजनातही फसवणूक केली जाते. अनेक वेळा एक्सपायर झालेल्या वस्तू ग्राहकांच्या गळ्यात मारल्या जातात. तसेच एखाद्या वस्तूचे दर कमी दाखवून इतर वस्तूंचे दर जादा लावून फसवणूक केली जाते. तसेच या कंपन्या क्वांटिटी व गुणवत्तेतही ग्राहकांची फसवणूक करतात. याचे ग्राहकांनी भान ठेवावे. असे कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण शिरोडे यांनी सांगितले.

स्थानिक व्यापारी कोपरगावकराच्या मदतीसाठी नेहमीच धावून आलेले आहे. विशेषतः कोरोना काळात ग्राहक सेवा, तसेच सातत्याने ६ महिने शहरातील सर्वसामान्य नागरिकांना पुरविलेली घरपोहच भोजन डब्यांची योजना देखील दररोज ५० सर्व सामान्य, गरजूंना समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मोफत डबे वाटप योजना सुरू आहे.

कोपरगाव बस स्थानकाचे सुशोभीकरण करून कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनने महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला आहे. यावेळी सर्व प्रथम व्यापारी गुलशन होडे, उल्हास गवारे, शाम जंगम, बाळासाहेब जंगम, चर्मकार दुकानदार मधुकर पवार आदींनी कुपन्स घेतली. तसेच विजय नानकर, भरत मोरे, धरमशेठ बागरेचा, केशव भवर, तुलसीदास खुबानी, बाळासाहेब कुर्लेकर आदींसह कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ किराणा मर्चंट असोसिएशनचे सदस्य, युवा किराणा व्यापारी, दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे अजित लोहाडे यांनी मानले.