सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाची ८७ वी वार्षिक सभा संपन्न 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाची ८७ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी गणेश चतुर्थी दिनी संपन्न झाली. विषय पत्रीकेवरील सर्व ९ विषय टाळ्यांच्या गजरात मंजुर करण्यात आले.

प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अंबादास देवकर यांनी प्रास्तविक केले. उपाध्यक्ष बाळासाहेब मांजरे यांनी उपस्थीतांचे स्वागत केले. संचालक विलास कुलकर्णी यांनी अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहिली. मागील सभेचा इतिवृत्तांत व्यवस्थापक हरीभाऊ गोरे यांनी वाचला सभासदांनी तो कायम केला.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांना मिळालेल्या पुरस्कारबद्दल  व संचालक मनेष गाडे यांची कारखान्याचे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा संघाचेवतीने सत्कार करण्यात आला. बिपीन कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध संस्थांची स्थापना करून त्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल्या, त्यात सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने ८७ वर्षात अनेक स्थित्यंतरे पाहिली, प्राप्त परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले.

इफको हा शेतकऱ्यांचा मित्र असुन त्यांनी नॅनो तंत्राचा अवलंब करत युरियाचे उत्पादन लिक्वीड स्वरुपात आणुन कृषी उत्पादन वाढीसाठी जाणीवपुर्वक प्रयत्न केले. नॅनो तंत्रज्ञानाचा सर्वच शेतकऱ्यांनी थेट बांधावर वापर करावा. यंदा पर्जन्यमान पुरेशा प्रमाणात झाले नाही. त्यामुळे दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून त्यांना पाट पाण्याचे ब्लॉक वाटप केले. मात्र त्याच्याबरोबरच शेती पाण्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. सन २००५ च्या समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे ते ही गेले, शेतकरी हक्काच्या पाण्यापासून दुरावला आहे. तेव्हा किमान पाण्याची सोय व्हावी असे ते म्हणाले.

सत्कारास उत्तर देताना विवेक कोल्हे म्हणाले की, समाजकारण, राजकारणात जे काही शिकायला मिळाले त्यात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याबरोबरच बिपीन कोल्हे, भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे, शेतकरी आदींचा मोलाचा वाटा आहे. आजवर जे पुरस्कार मिळाले ते सभासद शेतकऱ्यांना समर्पीत करत त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहे. सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने परिस्थीतीनुरूप बदल घडवत “आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचविले आहे.

सहकाराचे सक्षमीकरणाचा विडा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी उचलला असून त्यातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्यावर आपला भर आहे. सुत्रसंचलन भिवराज जावळे तर आभार उपाध्यक्ष बाळासाहेब मांजरे यांनी मानले. याप्रसंगी विवेक कोल्हे यांच्या हस्ते संचालक चंद्रकांत देवकर यांना मेडिक्लेम विमा धनादेश प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे सर्व संचालक तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, विविध संस्थांचे आजी माजी संचालक, संजीवनी उद्योग समुह सलग्न संस्था, कार्यकर्ते, सभासद शेतकरी, भाजपा पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.