ढोल ताशाच्या जल्लोषात उशीरा पर्यंत गणरायाची स्थापना श्री गणरायाला पाऊस पाडण्याच्या प्रार्थना

शेवगाव प्रतिनिधी, दि.२२ : सुखकर्ता दुखहर्ता श्री गणरायाचे शेवगाव शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोशात स्वागत करण्यात आले. सांयकाळी उशिरापर्यंत अनेक सार्वजनिक गणपती मंडळाच्या गणेशाची उत्साहात स्थापना झाली, सध्या पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे सावट असल्याने सार्वजनिक गणेश मंडळाची संख्या यंदा कमी झाली. मात्र स्थापना झालेल्या गणेश मंडळाच्या उत्साहाला पारावार नव्हता.

शेवगावाला गणेशोत्सवाची दीर्घ कालिन परंपरा असून शहरातील पहिल्या मानाच्या बापू दाजीबा लाटे या खासगी लाटे गणपतीची स्थापना १८९५ सालची आहे. भोईराज मित्र मंडळ, शिवशक्ती, भगतसिंग मित्रमंडळ, बालाजी व टिळक सार्वजनिक गणेश मंडळ ही येथील अन्य पाच मानाची जूनी गणेश मंडळे आहेत. या मंडळानी देखील शंभरी गाठली आहे. या मंडळा व्यतिरिक्त लहान मोठ्या १० मंडळानी शेवगाव शहरात तसेच तालुक्यातील श्री क्षेत्र आव्हाने देवस्थानासह जवळपास १०१ सार्वजानिक मंडळांनी श्री गणेशाची विधीवत पूजा अर्चा करून स्थापना केली.

अनेक मंडळांनी आपली गणेश मुर्ती ढोल ताशाच्या जल्लोशात मिरवणुकीने मंडळाच्या स्थळी नेली. गेल्या दोन-तीन दिवसापासून श्रींच्या मूर्ती, पूजेचे व सजावटीचे साहित्य विकत घेण्यासाठी बाजारात गणेश भक्तांची गर्दी उसळली होती. येथील खंडोबा मैदानावर स्थानिक कारागिरांनी बनविलेल्या मूर्ती विक्री स्टॉल उभारले होते. येथे साई आर्टचे काळे, विशाल आर्टचे जाधव बंधू, आकाश आर्टचे मनोज राऊत, आदि स्थानिक मूर्तिकार असून यांच्या इकोफ्रेडली शाडू माती व मुंबई मातीच्या गणेश मूर्तींना मागणी होती. अनेक व्यावसायिकानी नगर, शिरूर, व पेन हुन देखील मुर्त्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या. 

पाऊस पडू दे श्री गणेशाला विनवनी. “शेवगावात टिळक कालिन गणपती आहेत. या वेळी लाटे यांच्या प्रथम मानाच्या गणेशाच्या  स्थापना प्रसंगी आरती नंतर ” श्री गणराया आता अंत पाहू नको. पाऊस पडू दे, धन धान्य पिकू दे, सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना मंडळाचे प्रमुख अचल व महेश लाटे या बंधूनी केली.

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक शांतता कायम राखण्याच्या दृष्टीने शेवगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अन्य ठिकाणाहून आलेले एक परीक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक, ७ पोलीस कर्मचारी, चाळीस होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय राज्य राखीव दलाची तुकडी येणार असून त्यानंतर शेवगाव शहरात व तालुक्यातील प्रमुख गावात संचलन आयोजित करण्यात आले असून, खबरदारीचा उपाय म्हणून ५२ जणांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अशी माहिती पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली. दुपारी साडेबाराला सर्वप्रथम शेवगाव पोलीस ठाण्यात पो. नि. पुजारी यांचे हस्ते आरती करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.