कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : कोपरगाव तहसील कार्यालय येथे कोपरगाव मतदारसंघातील विविध समस्या घेऊन त्यांचे निराकरण होण्यासाठी सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे हे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नागरिकांसह बैठक घेत असतात आचार संहितेमुळे गेले काही महिने ही बैठक होऊ शकली नाही. सोमवार दि. ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सदर बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकरी, नागरिक, सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार महेश सावंत यांच्या दालनात वीज, पाणी, घरकुल, महसूल, रस्ते, चाऱ्या, ग्रामविकासाच्या योजना, गायगोठे आदींसह विविध विषयावर नागरिकांनी विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत समस्या मांडल्या. पात्र असून घरकुल मिळत नाही म्हणून आवाज उठवणाऱ्या वयोवृद्ध महिला, ग्रामपंचायत स्तरावरील योजनांना मंजुरी आणि निधी वेळेवर मिळत नाही यासाठी आग्रही झालेले सरपंच, विजेच्या समस्यांनी बेहाल होणारे शेतकरी यांची व्यथा विवेक कोल्हे यांनी यावेळी प्रशासनाला निदर्शनास आणून दिली. प्रश्न सुटले नाही तर आम्हाला आत्मदहन करावे लागेल अशी भूमिका असणाऱ्या नागरिकांना याच बैठकीत समाधान कारक उत्तरे घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्यासाठी कोल्हे यांनी आग्रह धरला.
विविध कारणे देऊन नेहमी अनेक समस्यांना फाटा देणाऱ्या पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना कोल्हे यांनी खडेबोल सुनावले. अतिशय बेजबाबदारपणे गटविकास अधिकारी यांच वर्तन असून परिणामी अनेक नागरिकांच्या समस्या सुटत नाही. यासह त्यांच्या कारभारात पारदर्शकता नाही अशी चर्चा ग्रामीण भागातील नागरिकांनी केली. जर हा कारभार सुधारला नाही तर सर्व गावातून जनता उद्रेक करेल आणि पर्यायाने अशा अधिकाऱ्यांचे कारनामे वरिष्ठ स्तरावर मांडू अशी चेतावणी देताच संबंधित विभागात एकच धांदल उडाली.
पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात असेल आणि कामे पूर्ण करण्यासाठी काही वेगळी मागणी केली जात असेल तर ही बाब खपवून घेतली जाणार नाही याचे भान त्यांनी ठेवावे असा सज्जड इशाराच कोल्हे यांनी दिला. त्यामुळे उपस्थिती नागरिकांना आपल्या समस्या लवकरच मार्गी लागतील अशी आशा या निमित्ताने चेहऱ्यावर दिसून आली.
गायगोठा प्रकरणी पुन्हा गदारोळ झाला असून कुणाच्या विशिष्ट सूचना असले तीच प्रकरणे घेण्यात येऊ नये. नियमांनुसार पात्र लाभार्थी यादी आम्हाला द्या, दूध का दूध पाणी का पाणी होईल व योग्य गावांना न्याय मिळेल. एकाच घरात दोनदा लाभ देणारे कोण आणि घेणारे कोण हे शेतकरी अद्याप विसरले नाहीत याचा अभ्यास करून कुणावर अन्याय करू नका असेही कोल्हे म्हणाले. वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम, महसूल, पंचायत समिती, वन विभाग असे विविध विभागांचे अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोपरगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या कारभाराने नागरिक संतप्त झाले असून विवेक कोल्हे यांनी या विषयावर प्रकाश टाकल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. टेबलाखालचा कारभारात तेजीत असून त्यांना जनतेचे गांभीर्य नाही असा थेट आरोपच अनेक नागरिकांनी यावेळी केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.