कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यासह उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबविण्याचे आदेश कोपरगाव नगरपालीकेला जिल्हाधिकारी यांनी दिल्याने अतिक्रमण करणाऱ्या कोपरगावकरांची झोप उडाली आहे.
कोपरगाव नगरपालीकेच्यावतीने दिलेली अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार शहरातील मुख्य रस्ता, गोदावरी नदीच्या छोट्या पुला पासुन ते थेट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा ते येवला नाका, गोदावरी पेट्रोल पंप ते गोकुळ नगरी, छञपती संभाजी महाराज पुतळा.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते संपूर्ण धारणगाव रोड, छञपती संभाजी महाराज पुतळा ते एसजी विद्यालय, एसजी विद्यालय ते सुदेश टाॅकीज पर्यंतचा रस्ता. तसेच शहरातील इतर अनेक अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम पालीकेच्यावती सुरु होणार आहे. त्यापुर्वी जिथे जिथे अतिक्रमण आहे तिथे तिथे मोजणी करून खुना करण्याचे काम सुरु झाले आहे. पालीकेच्या विविध पथकांनी मंगळवारी दिवसभर शहरातील मुख्य रस्त्यांची मोजणी करून रंगांच्या खुना केल्या केल्या आहेत.
नगररचना विभागाचे अधिकारी पिंगळ अश्विनी, रश्मी प्रधान, किरण जोशी, अतिक्रमण विभागाचे सुनिल आरण, मार्केट विभागाचे अधिकारी आदींच्या उपस्थितीत दिवसभर काम सुरु आहे. पुढील पाच दिवस हे काम सुरु राहील. ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांनी दिलेल्या मुदतीत त्वरित काढून घ्यावे अन्यथा पालीका काढुन टाकणार असल्याचे सांगण्यात आले.
नगररचना विभागाच्या मोजमापानुसार सर्व्हे करून नोटीस देण्याचे काम सुरु झाले आहे. नागरीकांचे नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावीत असे आदेश दिले. शहरातील केवळ रस्तेच नाही तर शासकीय भूखंडावरील अतिक्रमण तसेच आरक्षित जागा वरील कच्चे पक्के बांधकाम पाडण्याची तयारी पालीकेच्यावतीने करण्यात आल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.