शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : जिल्ह्यात ग्रामविकास व पंचायतराज विभाग प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन अंतर्गत शेवगाव तालुक्याला जिल्ह्यात सर्वाधिक लाभ झाला असून यावेळी तब्बल पाच हजार ६७९ घरकुलाचा लाभ झाला असल्याची माहिती गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर यांनी दिली.

पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रतिनिधीक स्वरूपात वरुर बु, भगूर, दादेगाव, वडुले बु. येथील घरकुल पात्र लाभार्थ्यांना गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीराम चव्हाण, विस्तार अधिकारी सचिन भाकरे यांचे हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली यावेळी ते बोलत होते.

यावेळी विस्तार अधिकारी सचिन भाकरे यांनी मार्गदर्शन करत घरकुल योजनेची माहिती दिली. तसेच, त्यांच्या काही अडचणी असल्यास त्यावर उपाय योजनेविषयी मार्गदर्शन केले.

या प्रत्येक घरकुल लाभार्थ्याच्या खात्यात एक लाख २० हजार रुपये टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येणार आहेत. त्यातील पहिला टप्पा १५ हजार मंजुरी प्राप्त झाल्यानंतर दुसरा टप्पा ७० हजार पाया भरणी पूर्ण झाल्यानंतर, तिसरा टप्पा ३० हजार रुपये घर वर छत पूर्ण झाल्यावर तर उर्वरित रक्कम, घरकूल पूर्ण झाल्यावर चौथा टप्यात पाच हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

याप्रसंगी वडुले बु. चे सरपंच अलका भिमराज सागडे, वरुर बु. चे सरपंच सचिन म्हस्के, भगूरचे सरपंच वैभव पुरनाळे, भिमराज सागडे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अमृत इसरवाडे, अमोल आल्हाट, अण्णासाहेब पाचारणे, वैभव नेमाने, अमर जगताप, अंकुश मरकड, रवी गरड आदिची उपस्थिती होती. कल्याण मुटकुळे यांनी सुत्रसंचलन केले.

घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात प्रमाणपत्रा बरोबरच पहिला हप्ता म्हणून प्रत्येकी १५ हजार रुपये जमा झाल्याने लाभार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण होते.
